। परभणी । वृत्तसंस्था ।
प्रेमकहाणीचा सैराट अंत झाल्याची आणखी एक घटना महाराष्ट्रात समोर आली आहे. परभणीमध्ये ऑनर किलिंगच्या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. मुलीने दुसऱ्या जातीतील मुलासोबत लग्न केले होते, मात्र आईवडिलांचा याला विरोध होता. मुलीच्या प्रेमविवाहाला विरोध असल्याने आईवडिलांनी पोटच्या मुलीची निर्घृण हत्या केली आहे. परभणीच्या पालम तालुक्यामधील ही घटना समोर आली आहे.
परभणीच्या पालम तालुक्यातील नाव्हा येथील 19 वर्षीय युवतीचे गावातील दुसऱ्या जातीतील युवकासोबत प्रेम संबंध होते. त्यांनी लग्न करण्याचा निश्चय ही केला. मात्र, मुलीने आंतरजातीय विवाह करू नये, म्हणून पालकांनी विरोध केला. तरी देखील तरुणी लग्न करण्यावर ठाम होती. (दि.21) एप्रिल रोजी रात्री 10 ते 22 एप्रिलच्या पहाटे दरम्यान नाव्हा येथे तरुणीच्या आई-वडीलांनी जीवे मारले.
यानंतर, आरोपी आईवडिलांनी त्याच रात्री कोणालाही थांगपत्ता लागू न देता भावकीतील निवडक व्यक्तींना सोबत घेतलं. भावकीतील व्यक्तींना सोबत घेऊन संगनमत करत हत्या केलेल्या तरुणीचा मृतदेह नाव्हा येथील स्मशानभूमीत जाळून पुरावा नष्ट केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर पालम पोलिसांत पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी दिलेल्या मयत तरुणीचे आई, वडील आणि भावकीतील इतर सहा जण अशा एकूण आठ जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.