विरोधकांचा विधानसभा कामकाजावर बहिष्कार

प्रति विधानसभा पायर्‍यांवर
| नागपूर | दिलीप जाधव |
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांना गुरुवारी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले होते. त्याला विरोध म्हणून शुक्रवारी विरोधी पक्षाने बहिष्कारचे हत्यार उपसले. त्यामुळे विधानसभेचे कामकाज तब्बल तीन वेळा तहकूब करण्यात आले होते. विधान भवनाच्या पायर्‍यांवर प्रति विधानसभा भरवून नेत्यांनी सरकारचे वाभाडे काढले. या आंदोलनात महिला आमदारही सहभागी झाल्या होत्या.

सीमाप्रश्‍नावरही प्रति विधानसभेत चर्चा करण्यात आली. मराठी भाषिक लोकांना आधार देण्यासाठी, हा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे. सर्वजण तुमच्यासोबत उभे आहोत, असे चित्र निर्माण करण्यासाठी दोन्ही सभागृहात ठराव एकमताने मंजूर करायला तयार आहोत, त्यामुळे तो ठराव घ्या, अशी विनंती सरकारला करण्यात आली होती; परंतु आज आठवडा संपतोय तरीही त्यांनी तो ठराव घेतला नाही. मात्र, सोमवारी तो ठराव कोणत्याही परिस्थितीत घेण्यास भाग पाडू, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला ठणकावून सांगितले.

विधानभवनाच्या पायर्‍यांवर प्रतिसभागृह भरवून महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेना नेते आ. भास्कर जाधव, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपले विचार मांडले. महापुरुषांचा अपमान करणार्‍या सरकारचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या.

भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांना महाविकास आघाडीच्या आमदारांनी श्रद्धांजली वाहिली. तर, दुसरीकडे शिंदेसरकार कामकाज करत आहेत. मुळात, सरकारने विधानसभा सदस्य म्हणून आ. मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहून कामकाज थांबवायला हवे होते, असे मत व्यक्त करत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

Exit mobile version