। मुंबई । प्रतिनिधी ।
ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू असताना विरोधी सदस्य आत घुसले. विरोधकांचा गोंधळ सुरू होता. विरोधी पक्ष शांत होण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यानी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या. हे आमदार घुसले तर घुसले, ते गावगुंडांप्रमाणे अंगावर तुटून पडत होते. तुमच्या सदस्यांना आवरा, आपण बसून चर्चा करू, असं मी त्यांना सांगितलं. पण विरोधी पक्षनेते त्यांना आवरायला तयार नव्हते. आम्ही आवरणार नाही, आम्हाला राग आलाय, असं विरोधी पक्षनेते म्हणाले, असं त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा
ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू असताना भाजप आमदारांनी केलेले कृत्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारे आहे. त्यामुळे म्हातारी मेल्याचं दुख नाही, पण काळ सोकावता कामा नये, म्हणूनच संसदीय कार्यमंत्र्यांनी त्यावर पावलं उचलावीत, असे आदेश जाधव यांनी दिले. मी जर एकही असंसदीय शब्द बोललो असेल किंवा शिवी दिली असेल तर मी स्वत:हून शिक्षा घ्यायला तयार आहे. तुम्हाला जी शिक्षा होईल ती मी घेईल. मी आक्रमक आहे. पण कधीच असंसंदीय शब्द वापरला नाही. आजचा दिवस माझ्या आयुष्यात काळा दिवस आहे, असंही ते म्हणाले. झाल्याप्रकारबद्दल आशिष शेलार यांनी माझी माफी मागितली आहे. फक्त त्यांनीच दोन-तीन वेळा माझी माफी मागितली. हे म्हणजे आधी लाथ लावायची आणि मग सॉरी म्हणायचं असा प्रकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.