किल्ले रायगडावर धार्मिक विधीस शिवप्रेमींचा विरोध

संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

। महाड । प्रतिनिधी ।

किल्ले रायगडावर कोणत्याही प्रकारचे धार्मिक विधी करु दिले जाऊ नयेत, अशी आग्रही मागणी शिवप्रेमींकडून सरकारला करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीसमोर काहीजण पिंडदान करीत असल्याचा व्हीडीओ व्हायरल झाल्याने त्याचे तीव्र पडसाद विविध संघटनांमध्ये उमटले. रायगड प्राधिकरणाचेे अध्यक्ष युवराज संभाजीराजे यांनीही याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.

रायगडावर आता विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे होऊ लागले आहेत. यामध्ये शिवराज्याभिषेक दिन जून महिन्यात मोठ्या जल्लोषात साजरा होतो. त्याचप्रमाणे शिवजयंती, शिवपुण्यतिथी अशा कार्यक्रमांना लाखो शिवभक्त दाखल होतात. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या या किल्ले रायगडावर आता विविध धार्मिक विधींची भर पडू लागली आहे. काही महिन्यांपूर्वी राख सदृश्य पावडर आणि पुस्तक पूजनाचा विधी केला जात असताना काही महिलांनी हा प्रकार रोखला होता.

या घटनेला काही महिने होत नाहीत तोच पुन्हा एकदा शिवसमाधीस्थळी पिंडदान केले जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. गडावर सातत्याने होत असणार्‍या विविध प्रकारच्या विधींमुळे शिवप्रेमी संतापले असून असे प्रकार वारंवार होत असताना पुरातत्व विभाग काय करतंय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.याबाबत युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले असून अशा विधींवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर शिवसमाधीस्थळी अभिवादन व्यतिरिक्त कोणतेच विधी केले जाऊ नयेत. याबाबत गृह मंत्रालय आणि पुरातत्व विभागाने उपाययोजना करावी, अशी मागणीही केली आहे.

किल्ले रायगड हा पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. सध्या गडावर रायगड प्राधिकरण मार्फत विविध विकासात्मक कामे सुरु आहेत. असे असले तरी प्रतिदिनी लाखो शिवभक्त गडाला भेट देत छ.शिवाजी महाराजांना अभिवादन करतात. गडावर येणार्‍या पर्यटक, शैक्षणिक सहलींमधील विद्यार्थी, शिवप्रेमी यांचे गडावर हाल होऊ नयेत म्हणून पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वैद्यकीय पथक आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी देखील पुरात्तव विभागाची आहे. मात्र गडावर किंवा परिसरात कोणत्याच सोईसुविधा नसल्याने शिवप्रेमींचे हाल होताना दिसत आहेत.

गडावर असलेली सुरक्षा यंत्रणा देखील कुचकामी ठरत आहे. अल्प सुरक्षा कर्मचारी ते देखील कंत्राटी पद्धतीने असल्याने हजारोंच्या घोळक्यासमोर या सुरक्षारक्षकांचे काहीच चालत नाही. यामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचे समोर येत आहे. याबाबत देखील विचार होणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Exit mobile version