उपमुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रकल्पाला विरोध

क्लस्टर योजेनेसाठी इमारतीवर हातोडा

। ठाणे । प्रतिनिधी ।

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रकल्प असलेल्या क्लस्टर योजनेला ठाणे पूर्व भागातील कोपरी येथील दौलत नगरमधील रहिवाशांचा विरोध कायम असताना शुक्रवारी (दि.13) ठाणे महापालिकेने अखेर येथील एका इमारतीवर हातोडा टाकून ही इमारत तोडली आहे.

या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव असताना विकासकाने कोणत्याही प्रकारचा करारनामा रहिवाशांसोबत केलेला नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. याशिवाय राहण्याची पर्यायी व्यवस्था न करता पालिकेने इमारत तोडताना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता कारवाई केली आहे. त्यामुळे क्लस्टर योजनेसाठीच इमारती धोकादायक ठरवल्या जात असल्याचा आरोप दौलत नगरमधील रहिवाशांनी केला आहे. या कारवाईला नागरिकांनी विरोध दर्शवला आहे.

या वसाहतीमध्ये जवळपास 15 इमारती असून 200हून अधिक कुटुंबे वास्तव्यास आहेत. यामधील काही इमारती या धोकादायक आणि मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांनी इमारतीचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला. त्यानुसार 2022 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत इमारतींच्या पुनर्विकासाचे भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. मात्र, कालांतराने विकासक आणि कमिटीने कोणालाही विचारत न घेता क्लस्टर योजनेचा घाट घालण्यात आला असल्याचा आरोप यापूर्वी इथल्या रहिवाशांनी केला आहे.

Exit mobile version