कोस्टल रोडकरिता वृक्षतोडीला विरोध

काँग्रेसकडून आंदोलनाचा इशारा

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।

सीबीडी आणि नेरूळ येथे शेकडो कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या जेटी सिडकोच्या चुकीच्या नियोजनामुळे फेल गेल्या आहेत. हे वास्तव असताना सीबीडी खारघरदरम्यान कोस्टल रोडची गरज काय, असा सवाल काँग्रेस पक्षाने विचारला आहे. विकासाला आमचा विरोध नाही, मात्र कोस्टल रोडसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडीला विरोध आहे. त्यामुळे सिडकोने कोस्टल रोडच्या निर्णयाचा फेरविचार करावा अन्यथा काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सय्यद नाशिर हुसेन यांनी सांगितले आहे.

सिडकोकडून सीबीडी ते खारघरदरम्यान कोस्टल रोड तयार करण्यात येत आहे. यासाठी सुमारे 30 हजार झाडे तोडली जाणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून प्रत्येक नागरिकाने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावावे, असे सांगत आहेत. मात्र, दुसरीकडे विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जात आहेत. विकासाला आमचा विरोध नाही, परंतु विकासाच्या नावाखाली होणार्‍या भरमसाठ वृक्षतोडीला आमचा विरोध असल्याचे नासीर हुसेन म्हणाले.

सिडकोकडून नेरूळ ते खारघर कोस्टल रोड आणि जेटीच्या बांधकामातील तांत्रिक त्रुटीबाबत माहिती देण्यासाठी वाशी येथील काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, प्रदेश काँग्रेसचे सचिव रामचंद्र (आबा) दळवी, इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नासीर हुसैन यांनी सांगितले की, सिडकोने कोट्यवधी रुपये खर्च करून सीबीडी आणि नेरूळ येथे जेटी तयार केल्या आहेत. त्यात सिडकोच्या नियोजनातील चुकांमुळे प्रवासी जलवाहतूक सुरू होऊ शकली नाही. शिवडी ते न्हावा शेवा अटल सेतूचे बांधकाम सुरू असताना, सीबीडी आणि नेरूळ येथे जेटी तयार करण्याची गरज काय? असा सवाल करत जेटी तयार करताना किमान 6 फूट समुद्र खोली असने आवश्यक आहे. सिडकोने तयार केलेल्या जेटींची खोली फक्त 3 फूट इतकी आहे.

नेरूळ ते खारघर कोस्टल रोड सीबीडी सेक्टर-15 मधून जात असल्याने, तेथील नागरिकांना त्रास होणार आहे, तसेच महापालिकेच्या वतीने वन टाइम प्लॅनिंग माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून झाडे लागवड व सुशोभीकरण करण्यात आले आहे. सिडकोने कोस्टल रोडबाबतचा आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा अन्यथा काँग्रेस पक्ष आंदोलन करेल, असे सय्यद नासीर हुसैन यांनी सांगितले.

Exit mobile version