| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यात महावितरण कंपनीकडून स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, स्मार्ट मीटर बसविण्यास कर्जत तालुका वीज संघर्ष समितीने जोरदार विरोध केला आहे. कर्जत तालुक्यात कोणत्याही स्थितीत स्मार्ट मीटर बसवू दिले जाणार नाहीत, असा इशारा वीज ग्राहक संघर्ष समितीचे बैठकीत घेण्यात आला.
कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीची बैठक शहरातील शनी मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती. ‘स्मार्ट मीटर’ बसवण्याच्या महावितरणच्या हालचालींना जोरदार विरोध करण्यात आला. जोपर्यंत ग्राहकांच्या सर्व शंका आणि अडचणींचं समाधान होत नाही, तोपर्यंत कोणत्याही घरावर स्मार्ट मीटर बसवू दिले जाणार नाहीत, असा ठाम निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
गतवर्षी ऑगस्ट 2024 मध्ये कर्जत तालुक्यात ग्राहक संघर्ष समितीने एक ऐतिहासिक आंदोलन छेडले होते. त्यावेळी वीज ग्राहकांनी सलग आठ दिवस लाक्षणिक उपोषण करत महावितरणला धारेवर धरले होते. त्या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लागले, मात्र काही समस्यांवर अद्यापही तोडगा लागलेला नाही. संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले की, महावितरणने जबरदस्तीने मीटर बसवण्याचा प्रयत्न केल्यास, जनआंदोलन उभारले जाईल. वीज ग्राहक आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली समिती आपली भूमिका स्पष्ट करेल.
बैठकीत उपस्थित अनेक सदस्यांनी मत मांडले की, गेल्या वर्षीच्या आंदोलनानंतर वीज वितरण व्यवस्थेमध्ये काही सकारात्मक बदल झाले आहेत. कर्मचाऱ्यांची वागणूक सुधारली आहे. आता तांत्रिक समस्यांवर लक्ष देणे गरजेचे असून त्यासाठी समिती सातत्याने पाठपुरावा करत आहे. तरी काही भागात महावितरण कर्मचारी कामात दिरंगाई करीत आहेत असेही मत मांडले. येत्या 15 दिवसांत तालुक्याच्या प्रत्येक फिडरप्रमाणे समित्या तयार करण्यात येणार असल्याचे समितीने ठरवले आहे. या समित्या महावितरणच्या कारभारावर नजर ठेवतील. त्यातही जर पुढील काळात परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर महावितरणच्या विरोधात तालुकाभरात मोठे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात येईल.
स्मार्ट मीटर बसवू न देण्याबाबत पुढील आठ दिवसांमध्ये अभ्यास करून आणि तज्ञांशी चर्चा करून योग्य नियोजन करणार आहोत. गेल्या वर्षभरात आंदोलन सुरू केल्यापासून अनेक वीजसंबंधी समस्या सोडवण्यात यश आले आहे. परंतु, अजूनही बऱ्याच तक्रारी प्रलंबित आहेत. नागरिकांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या तक्रारी आम्ही गांभीर्याने घेत आहोत आणि दर महिन्याला महावितरणकडे निवेदन देतो. समितीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे जून महिन्यात तब्बल 30 वीज पोल बदलण्यात आले. आता पुढचं पाऊल म्हणून फिडरनुसार (क्षेत्रनिहाय) समिती सदस्य नियुक्त करत आहोत, जेणेकरून प्रत्येक भागातील नागरिकांच्या अडचणी समितीमार्फत सोडवता येतील.
– ॲड. कैलास मोरे, समन्वयक