मनसेचे तालुका संघटक अमित कंटक यांचा आरोप
। अलिबाग । प्रतिनिधी ।
असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या शेगावपर्यंत अलिबाग आगारातून एसटी बस सुरु करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत आहे. मात्र, वेगवेगळी कारणे सांगून ही सेवा सुरु करण्यास विभाग नियंत्रकांकडून विरोध होत असल्याचा आरोप रायगड एसटी प्रेमी तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका संघटक अमित कंटक यांनी केला आहे. तसेच, राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे संबधित अधिकार्यांविरोधात शुक्रवारी (दि.11) लेखी तक्रार देखील करण्यात आली आहे.
शेगाव हे अखंड माहाराष्ट्राचे धार्मिक स्थळ आहे. याठिकाणी भाविकांची कायमच गर्दी असते. लाखो भक्तांचे एक श्रध्दास्थान मानले जाते. रायगड जिल्हयातील असंख्य भाविका शेगावला जात असतात. अलिबागमधूनही जाणार्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे शेगावला जाणार्या भक्तांसाठी अलिबाग-शेगाव बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी मागील तीन वर्षांपासून वारंवार केली जात आहे. याबाबत त्यांना अनेक वेळा स्मरणपत्र देण्यात आले आहे. मात्र, रायगडचे विभाग नियंत्रक प्रत्येक वेळेला वेगवेगळी कारणे देऊन गाडी सुरु करण्यास विरोध दर्शवित आहेत. तसेच, मध्यवर्ती कार्यालयाची परवानगी घेऊन या असे सांगून आपल्याकडील जबाबदारी, प्रवाशांवर ढकलत आहेत.
दरम्यान, अलिबाग-अहमदपूर एसटीला प्रवासी मागणी नसताना ही गाडी सुरु करण्याचा निर्णय विभाग नियंत्रकांनी घेतला आहे. जिल्ह्यातील रोहा, पेण, माणगांव, महाड, मुरूड आणि कर्जत आगारातून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या सुरु केल्या आहेत. मात्र, अलिबाग आगारातून अलिबाग-शेगाव गाडी सुरु करण्यासाठी विभाग नियंत्रक जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप रायगड एसटी प्रेमी तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेवा तालुका संघटक अमित कंटक यांनी केला आहे. प्रादेशिक व्यवस्थापक यांच्याशीदेखील संपर्क साधून ही बस सेवा सुरु करण्याची विनंती करण्यात आली आहे. परंतु, त्यांच्याकडूनदेखील असमाधानकार उत्तरे मिळाली आहेत.
प्रताप सरनाईकांकडे लेखी तक्रार
प्रवाशांच्या सेवेसाठी हे एसटी महामंडळाचे ब्रीद वाक्य आहे. मात्र, रायगड विभागात असे दिसून येत नाही. महामंडळाच्या अधिकार्यांकडूनच हा प्रकार घडत असल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अमित कंटक यांनी केली आहे. त्याबाबत राज्य परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.