जुनी गेट दुरुस्त करण्याची मागणी; कोट्यवधींच्या खर्चावर लीना गरड यांचे आक्षेप
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
कळंबोली येथील होल्डिंग पाँडमध्ये गेट पंप पंपिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव अनावश्यक असून, त्यासाठी होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च टाळावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नगरसेविका व गटनेत्या लीना अर्जुन गरड यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि विरोधी पक्षनेत्यांना निवेदन दिले आहे.
कळंबोलीची भौगोलिक स्थिती आणि समुद्रसपाटीपासून कमी उंचीमुळे अतिवृष्टी व भरती एकाच वेळी आल्यास काही भागांत पाणी साचते. मात्र, या समस्येवर नवीन पंपिंग स्टेशन उभारण्याऐवजी सिडकोने यापूर्वीच तयार केलेल्या होल्डिंग पाँडचा प्रभावी वापर करावा, अशी भूमिका गरड यांनी मांडली आहे. कळंबोली, रोडपाली आणि मार्बल मार्केट परिसरात सिडकोने सुमारे 3 लाख 58 हजार 670 चौरस मीटर क्षेत्रात होल्डिंग पाँड तयार केले आहेत. पाच मीटर खोली गृहीत धरल्यास त्यांची साठवण क्षमता सुमारे 17 लाख 93 हजार 350 घनमीटर असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे पाँडवरील नादुरुस्त जुनी गेट दुरुस्त करून चांगल्या दर्जाचे रोलर किंवा माईटर गेट बसविणे अधिक किफायतशीर ठरेल, असे गरड यांनी म्हटले आहे. 2026 च्या पावसाळ्यात महापालिकेने भाडेतत्त्वावर पाण्याचा निचरा करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध केली होती. या अनुभवावरून कायमस्वरूपी महागडी यंत्रणा उभारण्याची गरज नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
प्रस्तावातील गेट पंप आणि सबमर्सिबल पंपाच्या किंमतीत मोठी तफावत असल्याचा आक्षेपही निवेदनात घेण्यात आला आहे. तसेच निविदा प्रक्रियेबाबतही प्रश्न उपस्थित करून संबंधित बाबींची तांत्रिक व आर्थिक चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. 29 सप्टेंबरच्या स्थायी समिती बैठकीत हा प्रस्ताव फेटाळून जुन्या गेटच्या दुरुस्तीचा पर्याय स्वीकारावा, अशी मागणी गरड यांनी केली आहे.
