24 गावांतील शेतकऱ्यांचा 17 मार्चला तहसीलवर मोर्चा
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील चिल्हार नदीवर किकवीशिलार परिसरात प्रस्तावित शिलार धरणाला विरोध करण्यासाठी 24 गावांतील आणि वाड्यांमधील शेतकरी 17 मार्च रोजी कर्जत येथे मोठा मोर्चा काढणार आहेत. या मोर्चासाठी मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार असल्याने कर्जत शहरात अभूतपूर्व गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शासनाकडून स्थानिक शेतकऱ्यांची संमती न घेता धरण उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रस्तावित शिलार धरणामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होण्याची भीती व्यक्त केली जात असून, बाधित शेतकऱ्यांनी एकत्र येत ‘शिलार धरण विरोधी कृती समिती’ स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून 17 मार्च रोजी कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढून धरण प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकल्पाविरोधात रायगड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, मुंबई उच्च न्यायालयातही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी धरणाविरोधात तीव्र आंदोलन छेडले असून, सर्व्हेक्षणासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांनाही गावकऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जलसंपदा विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनीला काम पुढे नेता आलेले नाही.
कर्जत तालुक्यातील पाथरज, मोगरज, जामरुंग, कशेळे आणि रजपे या धरणग्रस्त गावांनी ग्रामसभेत धरणविरोधी ठराव मंजूर केले आहेत. तसेच शिलार, खरबाचीवाडी, किकवी-बोरवाडी, शिलारवाडी, धोत्रे, धोत्रेवाडी (1 व 2), शिंगढोळ, टेंभरे, आंबीवली, भक्ताचीवाडी, पिंगळस, फणसवाडी (1 व 2), खांदन (1 व 2), कोठिंबे, आनंदवाडी, मोग्रज, भल्याचीवाडी, जाधववाडी, चौधरवाडी, धामणी आणि जांभूळवाडी या भागांतील शेतकरी मोर्चात सहभागी होणार आहेत. हा मोर्चा कर्जत येथील छत्रपती संभाजी महाराज चौकातून निघणार असून, मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार असल्याने कर्जत शहर शेतकऱ्यांनी फुलून जाणार असल्याचे चित्र आहे.







