कळंबूसरे शेतकर्यांनी अधिकार्यांना हुसकावले
। उरण । प्रतिनिधी ।
केंद्र शासनाने राज्यातील जेएनपीए बंदर पागोटे ते चौक (29. 219 किलोमीटर) दरम्यान सहा पदरी प्रवेश नियंत्रित ग्रीन फिल्ड द्रुतगती राष्ट्रीय महामार्ग बांधण्यास मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा म्हणजेच बीओटी तत्वावर प्रकल्प विकसित केला जाणार आहे. त्यासाठी एकूण 4500.62 कोटी रुपये भांडवली खर्च होणार आहे. मात्र हा ग्रीन फिल्ड राष्ट्रीय महामार्ग समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिरनेर व कळंबूसरे गावातून हा ग्रीन फिल्ड महामार्ग जाणार आहे. मात्र चिरनेर व कळंबूसरेमधील शेतकर्यांनी या महामार्गाच्या सर्व्हेला तीव्र विरोध केला आहे.
केंद्रशासनातर्फे अधिकारी चिरनेर व कळंबूसरे येथे सर्व्हेला आले असताना येथील शेतकर्यांनी शासकीय अधिकार्यांना हुसकावून लावले. भांडवलदारांच्या फायद्यासाठी व एका खासगी कंपनीला वाचविण्यासाठी रस्त्याचा आराखडा बदलून तब्ब्ल 300 मीटरचा वळसा घालून हा रस्ता बनविण्याचा घाट एनएचएआयने घातल्यामुळे शेतकर्यांनी या जमिनीच्या मोजणीला तीव्र विरोध केला आहे. यावेळी शेतकरी विक्रांत पाटील, संतोष पाटील शिवप्रसाद भेंडे, देविदास पाटील, लक्ष्मण केणी आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रीन फिल्ड राष्ट्रीय महामार्गाला आमचा विरोध नाही. मात्र शेतकर्यांना विश्वासात न घेता जमिनीची मोजणी करायला सुरवात केली गेली. चिरनेर, कळंबूसरे येथे सर्व्हे चालू असताना चिरनेर व कळंबूसरेच्या शेतकर्यांनी शासकीय अधिकार्यांना विरोध केला. शेतकर्यांना विश्वासात घेतले जात नाही. एका खासगी उद्योजकाची जमीन वाचविण्यासाठी अनेक शेतकर्यांच्या जमिनी उध्वस्त करणार्या या ग्रीन फिल्ड मार्गाच्या जमीन सर्वेक्षणाला कळंबूसरे व चिरनेरच्या शेतकर्यांचा तीव्र विरोध आहे.
विक्रांत पाटील,
शेतकरी, कळंबूसरे