| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील पोटल, पाली आणि ढाक परिसरात येत असलेल्या टोरंट जलविद्युत प्रकल्पाला चोहोबाजूंनी विरोध होत आहे. या प्रकल्पाला वंचित बहुजन आघाडीच्यावतीने देखील विरोध करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या प्रकल्पामध्ये मोठ्या क्षेत्रफळाची जमिन ही वनखात्याची आहे. त्यामध्ये हजारो वनस्पती आहेत. त्यामुळे खुप मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र नष्ट होणार आहे. तसेच या परिसरातील बिबटे, वाघ आणि इतर वन्यप्राणी देखील नष्ट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोर परिसरातील दुबार भातशेती करणाऱ्यांच्या शेतीचे देखील खुप मोठे नुकसान होणार आहे. कुत्रिम जलाशयामुळे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होऊन गाळ साठणे व पाण्याची गुणवत्ता बिघडण्याची शक्यता आहे. त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे टोरंट जलविद्युत प्रकल्पाला जनतेचा विरोध असून त्या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात हरकती येत आहेत. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सरचिटणीस धर्मेंद्र मोरे यांनी कर्जत प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ आणि तहसीलदार डॉ. धनजंय जाधव यांना निवेदन दिले. आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुनील गायकवाड, प्रदीप ढोले, अनंत गायकवाड, प्रकाश गायकवाड, संजय अभंगे आदी प्रमुख उपस्थित होते.







