अलिबागच्या मुख्याधिकारी यांचा अजब कारभार
| अलिबाग | प्रतिनिधी |
सरकारने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. या बाबतची घोषणा सरकारने नुकतीच केली. शासनाच्या या निर्णयाने गणेशभक्तांसह गणेशोत्सव मंडळांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, या आनंदावर अलिबागच्या मुख्याधिकारी यांच्याकडून विरजन पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. इको फ्रेंडली नावाखाली निर्बंध लावून मार्गदर्शक तत्वांची जाहिरातीचे फलक लावण्यात आले आहे. त्यामुळे अलिबागचे मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांचा अजब कारभार असल्याची चर्चा जोरात सूरू आहे.
गणरायाचे आगमन येत्या 27 ऑगस्टपासून घरोघरी होणार आहे. जिल्ह्यातील वेगवेगळे गणेशोत्सव मंडळ बाप्पाच्या स्वागताच्या तयारीला लागले आहे. सामाजिक संदेश देणारे वेगवेगळे चलचित्र उभारणीचे कामही सुरु झाले आहे. गणेशोत्सव मंडळासह घरगुती गणेशमुर्तींचे स्वागत करण्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत. वेगवेगळ्या आकाराची, रंगाची सुबक गणेशमुर्ती आणण्यासाठी तयारी जोरात सूरू आहे. अलिबाग शहरामध्येदेखील ठिकठिकाणी गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. बेटी पढाव, बेटी बचाव, स्वच्छता राखा, देशभक्तीपर वेगवेगळे चलचित्र शहरातील मंडळाच्या वतीने काढले जातात. त्यामुळे या परिसरात उत्साह व धार्मिक वातावरण निर्माण होते. अलिबागमध्ये गणेशमुर्तींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते. सरकारने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे हा उत्सव या वर्षीच उत्साहात साजरा होण्याची शक्यता आहे. मात्र, या उत्सवावर अलिबागच्या मुख्याधिकारी यांनी विरजण टाकल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.
इको फ्रेंडली बरोबरच मार्गदर्शक तत्वाच्या नावाखाली जाचक अटी शर्ती लागू करणारे फलक शहरामध्ये ठिकठिकाणी नगरपरिषदेच्या वतीने लावण्यात आले आहेत. राज्य शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन या फलकांद्वारे केले जात आहे. या नियमांमुळे गणेशभक्तांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. प्रशासक तथा मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांच्या वतीने शहरात लावलेल्या फलकांनूसार यावर्षी गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करा, सार्वजनिक मंडळात मुर्ती चार फुट आणि घरगुती दोन फुटापेक्षा अधिक उंच नसावी, शाडूच्या मातीच्या मुर्ती तयार करा अशा अनेक प्रकारचे नियम लावण्यात आले आहेत.
शाडूच्या मुर्तीचा आग्रह या फलकांद्वारे करण्यात आला आहे. पीओपी मुर्ती वापरण्यास बंदी नसताना मुख्याधिकारी यांच्या शाडूच्या मुर्तीच्या आग्रहाबाबत प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. मुर्तींच्या उंचीवर मर्यादा लादल्याने भक्तांची घोर निराशा झाली आहे. अनेक गणेश मंडळांना आणि घरगुती भक्तांना हे नियम जाचक वाटत आहेत. जाचक नियमांमुळे उत्सव साजरा करण्याच्या स्वातंत्र्यावरच गदा येत असल्याची भावना अनेकजण व्यक्त करत आहेत. याबाबत मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, होऊ शकला नाही.
