तालुक्यात आतापर्यंत 402 शेतकर्यांनी घेतला लाभ
| महाड | वार्ताहर |
महाड तालुक्यामध्ये एकीकडे भातशेती पडीक राहण्याचे प्रमाण वाढत असतानाच दुसरीकडे मात्र शासनाच्या फळबाग लागवड योजनेतून शेतकर्यांना जीवनदान मिळत आहे. या योजनेमधून आतापर्यंत 402 शेतकर्यांनी लाभ घेतला आहे. पडीक जमीन आणि पडीक शेतजमीन यामध्ये फळ रोपांचे लागवड करून शेतकरी उत्पन्न घेऊ लागले आहेत.
शासनाकडून राबवली जाणारी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड योजना शेतकर्यांसाठी जीवनदायी ठरत आहे. महाड तालुका कृषी कार्यालयाकडून याबाबत शेतकर्यांमध्ये जनजागृती करण्याचे काम केले जात आहे. नाते रायगड विभागामध्ये कृषी सहाय्यक ए.बी. रुपणर यांनी याबाबत मोलाचे काम केले आहे. महाड तालुक्यात गतवर्षापर्यंत सुमारे 402 शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमधून या योजनेचा लाभ शेतकर्यांना दिला जात आहे. आंबा, काजू, चिकू, नारळ, आवळा, कोकम, फणस फळांच्या रोपांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. फळ रोपांची शास्त्रोक्त पद्धतीने कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली लागवड केलेली आहे. महाड तालुक्यामध्ये 402 शेतकर्यांमार्फत आतापर्यंत 179.69 क्षेत्रावर ही लागवड झाली आहे.
कोकणात घेतले जाणारे भातपीक मोठ्या प्रमाणावर असले तरी शेतकर्यांनी आपल्या पडीक जमिनीमध्ये किंवा जे शेतकरी भातशेती करत नसतील त्यांनी या योजनेतून फळबाग लागवड करून उत्पन्न घेतले पाहिजे.
ए.बी. रूपनर, कृषी सहाय्यक, महाड
या योजनेमधून मी आंबा रोपांची लागवड केली आहे. या योजनेतून नक्कीच उत्पन्न मिळणार असल्याने अन्य शेतकर्यांनीदेखील लाभ घेतला पाहिजे.
सुनील बाटे, शेतकरी







