| तळा | प्रतिनिधी |
तळा तालुक्यातील भानंग ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तांबडी गावात जवळपास 9 लाख रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजनेचा घोटाळा उघडकीस आला आहे. त्यामुळे येथील नळ कोरडे पडले आहेत. नव्याने बोअरवेल मारून पाणीप्रश्न मार्गी लावावा, अशी तांबडी ग्रामस्थांची मागणी आहे. परंतु, ठेकेदार आणि संबंधित अधिकारी जुमानत नसल्याने ग्रामस्थांनी तळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महादेव शिंदे यांच्याकडे या कामाच्या चौकशीची लेखी तक्रार 27 मे रोजी केली होती. गटविकास अधिकारी महादेव शिंदे यांनी या तक्रारीची पडताळणी व पाहणी तक्रारदार यांच्या समक्ष करण्यात यावी आणि त्याचा लेखी अहवाल संबंधितांना कळविण्यात यावा, असा आदेश रा.जि.प. उपविभाग ग्रामीण पाणी पुरवठा विभाग तळाचे उप अभियंता यांना दिला आहे.