महापालिका आयुक्तांचे आदेश; गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज
। कळंबोली । प्रतिनिधी ।
पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकासकामांना गती देण्याबरोबरच आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजनांचे प्रभावी नियोजन करण्यासाठी महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली. शुक्रवारी (दि.4) महापालिका मुख्यालयात झालेल्या या बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत आयुक्तांनी विकासकामे जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, अतिरिक्त आयुक्त महेश कुमार मेघमाळे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, मुख्य लेखाधिकारी पूनम पाटील, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त अभिषेक पराडकर, उपायुक्त रविकिरण घोडके, उपायुक्त मंगला माळवे, सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर, सहायक आयुक्त बाळाराम रातांबे, शहर अभियंता राजेश कर्डिले, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, कार्यकारी अभियंता विलास चव्हाण, शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, लेखाधिकारी संग्राम ऱ्होरकाटे यांच्यासह चारही प्रभागांचे अधीक्षक, विविध विभागप्रमुख, महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत ‘आपले सरकार’ तसेच पीजी पोर्टलवर प्राप्त झालेल्या नागरिकांच्या तक्रारींचा आढावा घेण्यात आला. नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित न ठेवता त्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, आगामी गणेशोत्सव 2026 च्या पार्श्वभूमीवर कृत्रिम विसर्जन तलावांची तयारी, गणेश विसर्जन मिरवणूक मार्गांवरील रस्त्यांची दुरुस्ती, आवश्यक नागरी सुविधा आदींचे नियोजन करण्याबाबतही आयुक्तांनी संबंधित विभागांना सूचना केल्या.
दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य साथरोगांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले. शहरातील अतिक्रमणे व अनधिकृत होर्डिंगविरोधातील कारवाई तसेच धोकादायक इमारतींबाबत महापालिकेकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचाही यावेळी आढावा घेण्यात आला.
महापालिकेच्या विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या विकासकामांना अधिक गती देणे, नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करणे आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक नागरी सुविधांचे योग्य नियोजन करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. त्यामुळे आगामी काळात महापालिका प्रशासनाच्या कामकाजाला अधिक वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
