| कामोठे | प्रतिनिधी |
सद्गुरू वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशन स्वानंदयोग साधना केंद्र, कामोठे यांच्या वतीने युवांच्या नेतृत्वाखाली अवयवदान जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानाचे उद्घाटन रविवारी (दि. 21) कामोठे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत तायडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. अरुण भगत, जीवनविद्या मिशनचे अनुभवी ट्रस्टी रासम, मूल्यमवार, अनिताताई मोरे, शाखेचे पदाधिकारी करलकर, तसेच मान्यवर उपस्थित होते.
आपले शरीर हे परमेश्वराची देणगी असून मृत्यूनंतरही आपले अवयव इतरांच्या जीवनात उपयोगी पडू शकतात. या संकल्पनेचा प्रसार करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. मृत्युपश्चात अवयवदान हे इतरांना नवीन जीवन देणारे तसेच पुण्याई मिळवून देणारे श्रेष्ठ कार्य आहे, हा संदेश या अभियानातून देण्यात आला.
या उपक्रमांतर्गत मानवी साखळी व जनजागृती रॅली काढण्यात आली. युवांनी प्रभावी पथनाट्य सादर करून अवयवदानाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवले. रॅली दरम्यान संपूर्ण कामोठे परिसरात घोषणाबाजी करत अवयवदानाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.






