कृषी अधिकारी धीरज तोरणे यांचे मत
। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील वरंध येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय व आत्मा यांच्यावतीने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत ग्रामस्तरावरील शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी, कृषी अधिकारी धीरज तोरणे यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सेंद्रिय शेती म्हणजे नैसर्गिक साधनांचा वापर करून, रसायनांचा वापर टाळून, पारंपारिक बियाणांचा वापर करून केलेली शेती, असे सांगितले. तसेच, सेंद्रिय शेतीची काही वैशिष्ट्ये विशद करत सेंद्रीय शेती काळाची गरज असल्याचे मत तोरणे यांनी व्यक्त केले.
या वेळी बोलताना कृषी अधिकारी तोरणे यांनी सेंद्रिय शेतीची वैशिष्ट्ये सांगितली. ते म्हणाले की, सेंद्रिय शेतीमध्ये कृत्रिम रासायनिक खते, कीटकनाशके, वाढ नियंत्रित करणारी रसायने यांचा वापर कमीत कमी केला जातो किंवा अजिबात केला जात नाही. सेंद्रिय शेतीमध्ये सेंद्रिय खते, पिकांचे अवशेष, जनावरांचे खत जसे की शेणखत, गांडुळ यांचा वापर केला जातो. सेंद्रिय शेतीमध्ये हिरवी झाडे मातीत मिसळल्याने सेंद्रिय पदार्थ आणि नायट्रोजन वाढते. सेंद्रिय शेतीमध्ये मातीची गुणवत्ता सुधारते. सेंद्रिय शेतीमध्ये तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. सेंद्रिय शेतीमध्ये शाश्वतता, मातीची सुपीकता आणि जैविक विविधता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे तोरणे म्हणाले.
यावेळी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रातील डॉ. संदीप कांबळे यांनी नैसर्गिक शेती व सेंद्रिय शेती या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच बिजामृत, विविध प्रकारचे सेंद्रिय टॉनिक दशपर्णी अर्क यांची सविस्तर माहिती दिली व जीवामृत बनवण्याची प्रात्यक्षिकं करून दाखवले. तसेच, वरंध गावचे सरपंच जयवंत देशमुख यांनी रासायनिक खत मुक्त शेती करणे विषयी मार्गदर्शन केले.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी बिरवाडी सुरज लांडगे, उपसरपंच सुभाष देशमुख, कृषी सहाय्यक उदय लेंगरे, अविनाश देशमुख, सुनिल कोंढाळकर, भाऊ उतेकर, योगेश देशमुख, राजेश धनावडे, यशवंत पोकळे, राजेंद्र सकपाळ, शहाजी देशमुख, नागेश देशमुख, सचिन जाधव, जितेंद्र देशमुख, निलेश राजाणे, मधुकर देशमुख, दत्ताराम शिळीमकर, मंगेश मालुसरे व शेतकरी उपस्थितीत होते. दरम्यान, उपस्थितांना धीरज तोरणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बिरवाडी कृषी पर्यवेक्षक दत्तात्रय नरूटे यांनी केले. सूत्रसंचालन सुनिल कोंढाळकर व गणेश देशमुख यांनी केले. तर, आभार प्रदर्शन वरंध कृषि सहाय्यक प्रमोद पार्टे यांनी केले.