मातीशिवाय पिकतो सेंद्रिय भाजीपाला

हायड्रोपोनिक्स व एक्वापोनिक्स शेतीचा यशस्वी प्रयोग
मत्स्यपालन व भाजीपाल्याचे दुहेरी उत्पादन

। पाली/बेणसे । वार्ताहर ।

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पाबळ जवळील जिर्णे गावात हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मातीविना सेंद्रिय भाजीपाला पिकविला जात आहे. शिवाय एक्वापोनिक्स शेतीद्वारे मत्स्यपालन व भाजीपाला एकत्र निर्मिती केली जात आहे. एकाच वेळी हायड्रोपोनिक्स व एक्वापोनिक्स शेतीचा प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात आलेला हा जिल्ह्यातील एकमेव प्रकल्प आहे. विजय येलमाले यांनी हा यशस्वी प्रयोग प्रत्यक्षात आणला आहे. नापीक, तोट्यात चाललेल्या शेतीमुळे किंवा शेती न करणार्‍या स्थानिक शेतकर्‍यांसाठी हे तंत्रज्ञान एक उत्तम पर्याय म्हणून पुढे येत आहे.
केमिकल इंजिनियर विजय येलमाले हे तब्बल 14 वर्षे सिंगापूरला नोकरी करत होते. लहानपणी बेळगाव जिल्ह्यातील अथणी या गावची जमीन विकून त्यांचे कुटुंब मुंबईत स्थाईक झाले होते. लहानपणापासूनच शेतीचे प्रचंड आकर्षण असल्याने त्यांनी या व्यवसायात येण्याचे ठरविले. शेतीमध्ये विविध आधुनिक प्रयोग करावेत आणि त्यातून पर्यावरणाला अनुकूल सेंद्रीय शेती करावी यासाठी त्यांनी काही वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातील पाबळ जवळील जिरणे गावात 15 एकर शेती घेतली. येथे त्यांनी हायड्रोपोनिक्स व एक्वापोनिक्स शेती करण्यास सुरुवात केली. त्यापूर्वी त्यांनी हे तंत्रज्ञान स्वतः शिकून घेतले. मागील 4 वर्षांपासून ते हा प्रकल्प राबवित आहेत. तयार झालेला भाजीपाला व मासे मुंबईत विक्रीसाठी पाठविला जातो. तसेच स्थानिक नागरिक, शेतकरी व मत्स्य विक्रेते त्यांच्याकडून भाजीपाला व मासे खरेदी करतात.

या तंत्रज्ञानामुळे पडीक, नापीक, व अनुत्पादित शेतीच वापरता करता येईल. रोजगार निर्मिती होईल. सामान्य शेतीच्या तुलनेत तंत्राचा वापर केल्यामुळे 90 टक्के पाण्याची बचत होते. जमिनीवर केलेल्या शेतीपेक्षा 40 टक्के अधिक उत्पादनात वाढ मिळते. विशेष म्हणजे ही पूर्णपणे सेंद्रिय शेती आहे. जमिनीत लागवडीच्या तुलनेत या तंत्राचा वापर करून पिकवलेल्या पिकामध्ये 40 टक्क्यांपर्यंत अधिक पोषक तत्त्वे असतात. या व्यतिरिक्त, मासे खाण्यासाठी वापरले जातात. आणि विकून चांगले उत्पन्न देखील मिळते. विजय येलमाले, हायड्रोपोनिक्स व एक्वापोनिक्स शेतीकर्ते

असा आहे प्रकल्प
5 गुंठ्यांचे 5 पॉलीनेट हाऊस तयार करून तेथे हायड्रोपोनिक्स व एक्वापोनिक्स शेती केली जाते. 5 गुंठ्याच्या प्रत्येक प्रकल्पासाठी 10 लाख रुपये खर्च आला आहे. यातील 3 प्रकल्प एक्वापोनिक्स शेतीचे आहेत. तर 2 प्रकल्प हायड्रोपोनिक्स शेतीचे आहेत. एक्वापोनिक्स शेतीमधून वर्षाला 3 ते 4 टन मत्स्य उत्पादन मिळते. तीलापिया या माशाचे उत्पादन घेतात. माशांबरोबर येथे भाजा देखील उत्पादित केल्या जातात असा दुहेरी फायदा एक्वापोनिक्स शेतीमधून होतो. हायड्रोपोनिक्स व एक्वापोनिक्स शेतीमधून सर्व प्रकारच्या पालेभाज्या, ढोबळी मिरची, लेट्युस, पालक, काकडी, ब्रोकोली, वाटाणा व टॉमेटोचे आदींचे वर्षाला तब्बल 3 ते 4 टनाचे उत्पादन मिळते. भाजीला जमिनीवर पिकवलेल्या भाज्यांपेक्षा अधिक दर मिळतो. तर मासे 200 रुपये किलोने विकले जातात.

Exit mobile version