। अलिबाग । वार्ताहर ।
जिल्ह्यांना निर्यात केंद्र म्हणून विकसित करून निर्यात वाढीकरिता जिल्हा निर्यात प्रचालन समिती अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा उद्योग केंद्र व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था अलिबाग येथे मार्गदर्शन कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेकरिता अपेडा या संस्थेचे सहाय्यक संचालक प्रशांत वाघमारे, उद्योग सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे सतीश भामरे हे उपस्थित होते.
जिल्ह्यातील स्थानिक साधन संपत्तीचा व भौगोलिक मानांकित चिन्ह प्राप्त अलिबागचा पांढरा कांदा व आंबा उत्पादन या घटकांचा निर्यात वाढीकरिता शेतकर्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले यांनी कृषी माल निर्यातीकरिताची प्रक्रिया, जागतिक उपलब्ध बाजारपेठ निर्यात विषयक कार्यपध्दती व कृषी मालाची जागतिक स्तरावरील प्रसिध्दी याकरिताच्या माहितीचे सादरीकरण करण्यात आले.
कृषी प्रक्रिया उद्योग व उद्योग विभागाकडील आर्थिक अनुदानासंबंधी शासकीय योजना तसेच शेतकर्यांनी व्यापारी पद्धतीने कृषी उत्पादन घेवून उपलब्ध बाजारपेठेचा फायदा करून घेवून स्वत:चा आर्थिक फायदा करून घ्यावा, असे आवाहन भामरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील पांढरा कांदा उत्पादक शेतकरी व आंबा उत्पादक शेतकरी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.