| उरण | वार्ताहर |
गोदरेज ॲण्ड बॉईस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड, खालापूर आणि सीनियर अप्रेंटिसशिप ॲडव्हायझर पनवेल व प्राचार्य उरण मा.वे. पिल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांसाठी अप्रेंटिसशिप ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते.
या विशेष उपक्रमामध्ये रायगड जिल्ह्यातील विविध औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून सुमारे 225 प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला. इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, टर्नर, मशीनिस्ट, डिझेल मेकॅनिक आदी ट्रेड्समधील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेतला. लेखी चाचणीद्वारे होतकरू प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात आली असून, पात्र उमेदवारांसाठी गोदरेज कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारीची संधी खुली करण्यात आली आहे.
ड्राईव्हदरम्यान कंपनीचे मॅनेजर विशाल भावजेकर व हेड तानाजी चव्हाण यांच्याबरोबर मा.वे. पिल्ले यांनी विशेष चर्चा केली. या चर्चेत रायगड जिल्ह्यातील ट्रेड अपग्रेडेशन तसेच प्रशिक्षणार्थ्यांना भविष्यात गोदरेज कंपनीमध्ये स्थायीक रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासंदर्भातील सकारात्मक चर्चा झाली. या उपक्रमामुळे प्रशिक्षणार्थ्यांमध्ये नवचैतन्य आणि आत्मविश्वास निर्माण झाला असून, जिल्ह्यातील युवकांना उद्योगक्षेत्रात सक्षमपणे उतरण्यासाठी अशा संधी उपयुक्त ठरणार आहेत, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.







