अश्‍वमेध यज्ञाचे खारघरमध्ये आयोजन

। पनवेल । वार्ताहर ।

जानेवारी महिन्यात अयोध्या येथील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आता सर्व राम भक्तांचे लक्ष लागले आहे ते 21 ते 25 फेब्रुवारीदरम्यान नवी मुंबईतील खारघर येथे होणार्‍या ऐतिहासिक अश्‍वमेध यज्ञाकडे. अखिल विश्‍व गायत्री परिवार शांतीकुंज हरिद्वारद्वारा खारघरमध्ये आयोजित 49 वा अश्‍वमेध यज्ञ एक जागतिक कार्यक्रम असून यामध्ये 100 हून अधिक देशातील नागरिक सहभागी होणार आहेत.

पाच दिवस चालणार्‍या या अश्‍वमेध यज्ञाचे आयोजन खारघर येथील सेंट्रल पार्कमध्ये करण्यात आले आहे. या महायज्ञात भव्य मंगल कलश यात्रा, 1008 कुंडिय गायत्री महायज्ञ, दीप महायज्ञ, अध्यात्मिक प्रवचने, भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा दर्शविणारी प्रदर्शनी व विराट पुस्तक मेळ्याचा समावेश आहे. याशिवाय रक्तदान, अंगदान जागरुकता व व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले आहे. वर्ण, धर्म, भाषेचा कोणताही भेदभाव न करता सर्व स्तरातील लोक या आध्यात्मिक पुनर्जागरणासाठी एकत्र येणार आहेत.

Exit mobile version