| मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी |
किसान क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत शुक्रवारी (दि.16) सकाळी 11 वाजता माणगाव-कोशिंबळे येथे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत मधमाशी पालन प्रशिक्षण, तसेच जिल्हा स्तरीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र किल्ला-रोहाचे शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी, किसान क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष टि.एस. देशमुख, जिल्हा अध्यक्ष भरत राणे, महाराष्ट्र संघटक विनायक देशमुख, नरेश म्हस्के, माणगाव तालुका अध्यक्ष रघुनाथ गोसावी तसेच रायगड जिल्ह्यातील सुमारे 500 शेतकरी सदस्य या कार्यक्रमाचा लाभ घेणार आहेत. कार्यक्रमाचे सर्व नियोजन किसान क्रांती संघटना माणगाव तालुका कमिटी मार्फत करण्यात येणार आहे, अशी माहिती किसान क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्रीधर जंजिरकर यांनी दिली आहे. मुरुड तालुक्यातील त्याच प्रमाणे इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मधमाशी पालन प्रशिक्षणात सहभागी होऊन नवीन उपक्रमाची सुरुवात करून आपला उत्कर्ष साधावा असे, आवहान जंजिरकर यांनी केले आहे.







