। सुधागड-पाली । वार्ताहर ।
अंगणवाडी बालकांसाठी मंगळवारी (दि.15) परळी येथील अंगणवाडीत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा 26 बालकांना लाभ झाला. यावेळी बालकांची ऊंची, वजन करून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली व त्यांची काळजी घेणेबाबत डॉक्टरांनी उपस्थित मातांना मार्गदर्शन केले. तसेच, त्यांना औषधे, पौष्टिक आहार व नाचणी सत्वाचे वाटप करण्यात आले.
यावेळी मुलांची अद्ययावत माहिती पुरविल्याने कळंब येथील अंगणवाडी सेविका शोभा चंद्रकांत आखाडे यांचे संस्थेच्या लोकांनी कौतुक केले. या कार्यक्रमाला डॉ. वसंत काणे, अध्यक्ष कोकण पदवीधर संस्था डॉ. दीपा वैद्य, राजेश बामणे, दत्तात्रय दळवी तसेच अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी रंजना म्हात्रे यांनी या शिबिराचे नियोजन करण्यात विशेष परिश्रम घेतले.




