। कल्याण । वार्ताहर ।
कल्याण परिमंडळातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडीत झालेले ग्राहक, वीजबिलाबाबत वाद व वीजचोरीच्या दखलपूर्व आणि प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोडीने निपटारा करण्याची ग्राहकांना संधी देण्यात आली आहे. त्यासाठी ग्राहकांना तालुकास्तरावर शनिवारी (दि.13) लोकअदालतीत सहभागी व्हावे लागणार आहे. परिमंडळातील संबंधित ग्राहकांना लोकअदालतीत सहभागी होण्याबाबत विधी विभागाकडून नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. नोटिस मिळाली नसेल तरीही संबधितांना अदालतीत सहभागी होता येईल.
कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडीत ग्राहकांना विलासराव देशमुख अभय योजनेतून व्याज व दंड माफीसोबतच थकीत रक्कमेत अनुक्रमे 5 व 10 टक्के सवलतीचा लाभ मिळवून वीजपुरवठा पुर्ववत करून घेण्याची संधी आहे. संबंधित ग्राहकांनी तालुका न्यायालयात आयोजित लोकअदालतीत सहभागी होऊन प्रकरणांचा निपटारा करून घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.