| रेवदंडा | प्रतिनिधी |
भारत सरकार अंतर्गत क्रीडा व युवा कार्यक्रम मंत्रालय संचालित मेरा भारत आणि ओएसिस बहुउद्देशीय समाजाभिमुख संस्था, रेवदंडा यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूड तालुक्यासाठी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा 2025-26 (खुला गट) चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी संपन्न होणार आहे.
या स्पर्धेमध्ये 16 ते 29 वयोगटातील युवक-युवतींनी सांघिक तसेच वैयक्तिक स्वरूपात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. मुरूड तालुक्यातील युवा वर्गामध्ये क्रीडा संस्कृती व्हावी तसेच स्थानिक स्तरावर त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या दुहेरी उद्देशातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांनी सांगितले आहे. स्पर्धेअंतर्गत सांघिक खेळामध्ये पुरुषांसाठी कबड्डी व महिलांसाठी खो-खो या खेळांचा समावेश आहे. तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारांतर्गत पुरुष व महिलांसाठी धावणे (400 मी) आणि गोळाफेक या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक स्पर्धकांनी https://forms.gle/1wVXuG3qx4CZj3yX8 या लिंकवर आपली नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धकांना प्रवेश निश्चितीसाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे. स्पर्धक संख्या मर्यादित असून, जर पूर्व नोंदणीद्वारे त्या संख्येची पूर्ती झाली नाही तरच स्पर्धेच्या दिनी सकाळी आयतेवेळी प्रवेश देण्यात येईल. मात्र, त्यासाठी सकाळी 8.00 ते 10.00 मधील नोंदणीमध्ये प्रवेश नोंदविणे अनिवार्य असेल. तरी याबाबत अधिक माहिती व नोंदणीसाठी संस्था समन्वयक तथा उपक्रम प्रभारी दर्श नागोटकर (मो. 7057518263) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
मुरूड तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा 2025-26 चे आयोजन
