| अलिबाग | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशावरून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये (दि.14) मार्च 2026 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग तेजस्विनी निराळे यांनी दिली आहे.
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्ह्यातील सर्व न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी अपिले, मोटार अपघात प्रकरणे, विवाह विषयक प्रलंबित प्रकरणे तसेच ग्रामपंचायत यांच्याकडील घरपट्टी, पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था आदी प्रकरणे लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येतात.
यापूर्वी दि.13 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 5 हजार 169 आणि वादपूर्व 12 हजार 751 असे एकूण 17 हजार 920 एवढी प्रकरणे निकाली निघाली आहेत. यामुळे दि.14 मार्च 2026 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे आणि या लोक अदालतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






