तडजोडीने प्रकरणे निकाली काढण्याची नागरिकांना संधी
| अलिबाग | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 12 सप्टेंबर 2026 रोजी रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रलंबित तसेच वादपूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. बी. अग्रवाल यांनी केले आहे.
या लोकअदालतीत न्यायालयांमध्ये प्रलंबित दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, अपिले, मोटार अपघात दावे, विवाहविषयक प्रकरणे तसेच ग्रामपंचायतींची घरपट्टी-पाणीपट्टी, वीज वितरण, दूरसंचार, बँका, पतसंस्था व अन्य वित्तीय संस्थांच्या थकबाकीशी संबंधित वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. लोकअदालतीत कोणतीही फी आकारली जात नाही. येथे होणारा निवाडा अंतिम व बंधनकारक असून त्याविरुद्ध अपील करता येत नाही. प्रकरणे जलदगतीने निकाली निघत असल्याने वेळ, पैसा आणि श्रमाची बचत होते. तसेच निकाली निघालेल्या प्रकरणांतील नियमानुसार भरलेली न्यायालयीन फी परत मिळते. दरम्यान, 9 मे 2026 रोजी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत रायगड जिल्ह्यातील 4 हजार 267 प्रकरणे निकाली काढण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा मिळालेल्या या संधीचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
