| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरातील शारदा मंदिर कर्जत मराठी माध्यम शाळेत राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध मैदानी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्याचवेळी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्तृत्व गाजवणाऱ्या खेळाडुंची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
शारदा मंदिराच्या प्रांगणात आयोजित केलेल्या राष्ट्रीय क्रीडा दिनाची सुरुवात हॉकीचे महान खेळाडू आणि ‘हॉकीचे जादूगार’ मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली किसवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुलींसाठी स्किपिंग, मुलांसाठी फास्ट बॉल चॅलेंज, तसेच विद्यार्थी-शिक्षकांसाठी बॅडमिंटन, खो-खो, कबड्डी, लगोरी, धावणे, रेल्वे, ड्रेस वॉकथॉन आणि सायकलिंग अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या विविध क्रीडा उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, संघभावना, आत्मविश्वास आणि खिलाडूवृत्ती विकसित होते, असा संदेश यावेळी देण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेत राष्ट्रीय क्रीडा दिनाचा आनंद घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण होण्यासोबतच निरोगी आणि तंदुरुस्त जीवनशैलीचा संदेशही देण्यात आला. दरम्यान, प्रफुल्ल देशमुख आणि चेतना महागडे यांनी क्रीडापटूंची माहिती दिली. तसेच, विद्यार्थ्यांना मेजर ध्यानचंद यांच्या जीवनकार्याची तसेच भारतीय क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची माहिती देण्यात आली.
मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन
