| आगरदांडा | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषद अलिबाग, कृषी विभाग पंचायत समिती मुरुड जंजिरा आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुरुड यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय कृषी मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा गुरुवार, दि.25 जून रोजी सकाळी 10 वाजता पंचायत समिती मुरुड जंजिरा येथील दरबार हॉल येथे पार पडणार आहे.
शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, शासनाच्या विविध कृषी योजना तसेच कृषी क्षेत्रातील नवीन संधींची सविस्तर माहिती मिळावी, या मुख्य उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात कृषी विषयक विविध प्रात्यक्षिके व प्रदर्शनांचेदेखील आयोजन करण्यात येणार असून, उपस्थित शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषद सेस फंड योजना आणि पंचायत समिती सेस अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले जाईल. तालुक्यातील सर्व शेतकरी, महिला बचत गट, कृषी उत्पादक संस्था तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व नागरिकांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुरूड पंचायत समिती गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ यांनी केले.
तालुकास्तरीय कृषी मेळावाचे आयोजन

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606