म्हसळ्यात हिवाळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन

| म्हसळा | वार्ताहर |

श्रम एवम जयते हे ब्रीद वाक्य घेऊन तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात अग्रगण्य कार्य करीत असलेली सोमजाई माता क्रीडा मंडळ ट्रस्ट खरसई आणि पंचायत समिती म्हसळा शिक्षण विभागाच्या वतीने शालेय हिवाळी क्रीडा स्पर्धा दि. 2 व 3 डिसेंबर रोजी खरसई येथे सामाजिक सभागृहाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आल्या आहेत.

स्पर्धेत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. स्पर्धेत कबड्डी, खो-खो, लांब उडी, उंच उडी, रिले स्पर्धा, गोळा फेक, थाळी फेक आणि योगा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी सोमजाई क्रीडा मंडळाचे विश्वस्त आणि शिक्षण विभागाचे सर्व शिक्षकवृंद यांनी जोमाने तयारी केली असून, स्पर्धकांना दोन दिवस भोजन व्यवस्था करण्यात आली असल्याचे संस्थाप्रमुख चंद्रकांत खोत यांनी कळविले आहे. ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थीवर्गाला शिक्षणाबरोबरच आयोजित क्रीडा स्पर्धांत प्रोत्साहन मिळणार आहे.

Exit mobile version