मुंढेंच्या बदलीबाबत संघटना आक्रमक

बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यासाठी मुख्यमंत्रांना साकडे

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्र पडताळणीच्या कार्यवाही नंतर दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली. या बदलीनंतर रायगड जिल्ह्यातील विविध संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंढे यांच्या बदलीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी रायगड जिल्ह्यातील कार्यकर्ते व विविध संघटनांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तुकाराम मुंढे यांनी दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव म्हणून सूत्रे हाती घेतल्यावर कामकाज अधिक गतिमान व पारदर्शक करण्यासाठी पुढाकार घेतला. सरकारी खात्यामध्ये असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याची सूचना सर्व विभागाला देण्यात आली. जिल्हा परिषदेसह सर्व विभाग कामाला लागले. त्यामुळे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन नोकरीला लागलेल्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली. मुंढे यांनी सुमारे सहा ते सात महिन्यांपूर्वी विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दिव्यांग सक्षमीकरण विभागात मोठे बदल घडवून आणले. दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या या विभागाला त्यांनी नवी दिशा देत प्रभावी निर्णय घेतले, त्यामुळे विभाग कार्यक्षमतेकडे वाटचाल करू लागला.

दिव्यांग हक्क अधिनियम 2016 ची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू करणे, जिल्हास्तरावर स्वतंत्र दिव्यांग सक्षमीकरण कार्यालये सुरू करणे, शासकीय आस्थापनांमध्ये दिव्यांगांसाठी 4 टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी आदेश निर्गमित करणे, अशा अनेक महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. बोगस दिव्यांग प्रमाणपत्रधारकांविरोधात कारवाई, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 900 हून अधिक संस्थांवर कारवाई, विविध समित्यांची स्थापना यामुळे विभागात शिस्त आणि पारदर्शकता निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दिव्यांगांसाठी स्वतंत्र संकेतस्थळ (वेब पोर्टल) सुरू करून विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्याने लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचेही निवेदनात सांगण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांमुळे दिव्यांग बांधवांमध्ये त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण झाली असून, प्रत्यक्ष लाभ मिळू लागल्याचे सांगण्यात आले. परंतु, तुकाराम मुंढे यांची या विभागातून अन्य विभागात बदली केल्याच्याविरोधात रायगड जिल्ह्यातील विविध संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे साकडे घालून मुंढे यांची बदली तात्काळ स्थगित करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. याबाबत उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके यांना निवेदन देण्यात आले.

Exit mobile version