। पुणे । प्रतिनिधी ।
भारतातील अग्रगण्य ऊर्जा उत्पादक कंपनी इंडीयन ऑईल यांनी प्रायोजित केलेल्या व आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना(फिडे) यांनी आयोजित केलेल्या दुसर्या चेस फॉर फ्रीडम परिषदेचे आयोजन येत्या 19 ते 21 जुन दरम्यान पुणे येथे करण्यात आले आहे.
फिडेच्यावतीने अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांनी या परिषदेचे आयोजन केले असून विविध ठिकाणी तुरुंगात असलेल्या जगभरातील बंदीवानांच्या पुनर्वसनासाठी बुद्धिबळ या खेळाचा कशा प्रकारे उपयोग करता येईल, यासंबंधी जगातील विविध देशांमधून आलेले तज्ञ चर्चा करणार आहेत. शासन मान्यतेने या परिषदेचा पहिला टप्पा म्हणुन फिडे प्राधिकृत परदेशी प्रतिनिधींचे शिष्टमंडळ येरवडा मध्यवर्ती कारागृहास दि.19 जुन रोजी सकाळी 10 वाजता भेट देऊन स्पर्धेत भाग घेतलेल्या बंद्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच, महिला व पुरुप बंद्यांसोबत प्रातिनिधिक स्वरुपात त्यांचेसोबत बुध्दीबळ खेळणार आहेत व तद्नंतर हॉटेल अँड हयात येथे या परिषदेचा पुढचा टप्पा आयोजित करण्यात आला आहे.