मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचे आयोजन

| रायगड | वार्ताहर |

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा गतिमानता पंधरवडा दि.17 ते दि.30 रायगड जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत सर्व तालुक्यांमध्ये जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक गुरुशांत हरळय्या यांनी केले आहे.

या पंधरवड्यात रायगड जिल्ह्यातील महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था इत्यादी ठिकाणी जनजागृती मेळाव्याच्या माध्यमातून प्रचार व प्रसिध्दी करण्यात येणार आहे. तसेच, पात्र लाभार्थ्यांचे जागेवर अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कौशल्य उद्येाजकता विकास विभाग, आरसेटी, एमसीईडी, मिटकॉन इ. संस्थेद्वारे उद्येाजकता विकास प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या युवक/युवतीचे, जिल्ह्यातील औद्योगिक समुह विकास घटक, एक जिल्हा एक उत्पादन तसेच भौगोलिक मांनाकन प्राप्त उद्योजकांचे अर्ज प्राधान्याने या पंधरवाड्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत घेण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड बाजार समोर, रायगड-अलिबाग येथे संपर्क साधाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version