कामोठेत शेकापतर्फे दहीहंडीचे आयोजन

। पनवेल । प्रतिनिधी ।

कामोठे येथे शेतकरी कामगार पक्षातर्फे दहीहंडी उत्सव 2024 चे आयोजन 27 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता करण्यात आले आहे. माजी आ. बाळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सिडको समाज हॉलसमोर, सेंट्रल बँक चौक, सेक्टर 20 याठिकाणी उत्सव साजरा केला जाणार आहे. या उत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी सभापती व नगरसेवक प्रमोद भगत यांनी केले केले आहे.

शेतकरी कामगार पक्ष, कामोठेतर्फे दरवर्षी दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. मोठ्या संख्येने दहीहंडी पथक या ठिकाणी येऊन हजेरी लावून सलामी देत असतात. दहीहंडी पाहण्यासाठी सर्व नागरिक त्या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहतात. यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तसेच दहीहंडी फोडल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडीतर्फे पारितोषिक मानधन व बक्षीस देण्यात येणार आहे.

यावर्षीची दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या दहीहंडी उत्सवात एकूण पारितोषिक 2 लाख 22 हजार 222 रुपयांची असणार आहेत. तसेच ट्रॉफीदेखील देण्यात येणार आहेत. आठ थरांची हंडी फोडणार्‍या पथकाला प्रथम पारितोषिक (खुले) 1 लाख 11 हजार 111 रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. तर, सात थरांच्या सलामीसाठी 5001, सहा थरांच्या सलामीसाठी 3001 आणि पाच थरांच्या सलामीसाठी 2001 रुपये देण्यात येणार आहेत. यावेळी कोळीगीत, लोकगीत, मराठी गाण्यांचा ‘आम्ही सारे कलाकार’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Exit mobile version