उद्या जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन

पालकमंत्र्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन

| अलिबाग | प्रतिनिधी |

उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.14 व दि.15 सार्वजनिक ग्रंथालय व जिल्हा ग्रंथालय, डोंगरे हॉल, अलिबाग येथे रायगड जिल्हा ग्रंथोत्सव 2022चे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खा. श्रीरंग बारणे, खा. सुनील तटकरे, आ. जयंत पाटील, निरंजन डावखरे, बाळाराम पाटील, अनिकेत तटकरे, भरत गोगावले, रवींद्र पाटील, आदिती तटकरे, महेंद्र थोरवे, सहाय्यक ग्रंथालय संचालक, मुंबई विभाग शालिनी इंगोले, ग्रंथालय संचालक, मुंबई दत्तात्रय क्षीरसागर, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने दि.14 व 15 विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.14 सकाळी 10.30 वाजता माजी नगराध्यक्ष, अलिबाग प्रशांत नाईक यांच्या हस्ते व जे.एस.एम. महाविद्यालय, अलिबागचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील यांच्या उपस्थितीत ग्रंथ पूजन संपन्न होणार आहे. सकाळी 11 वाजता पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन संपन्न होणार असून, यावेळी ज्येष्ठ साहित्यिका इंदुमती जोंधळे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व बदललेले साहित्य प्रवाह या विषयावरील परिसंवादाचे आयोजन. दुपारी 3 ते 4.30 स्पर्धा परीक्षेची तोंड ओळख व आव्हाने या विषयावरील परिसंवादाचे आयोजन. दुपारी 4:30 ते 5:30 वाजता समाज माध्यमांवरील लिखाणास साहित्य म्हणता येईल का या विषयावरील परिसंवादाचे आयोजन. सायंकाळी 5.30 ते 6.30 कवी संमेलनाचे आयोजन तर सायंकाळी 7 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.15 सकाळी 11 वाजता माझे वाचन आणि मी या विषयावरील परिसंवादाचा आयोजन. दुपारी 3 ते 4 गझल मुशायराचे आयोजन. दुपारी 4 ते 5 रायगड जिल्ह्याच्या जडणघडणीतील वृत्तपत्रांचे व प्रसार माध्यमांचे योगदान या विषयावरील परिसंवादाचे आयोजन. सायंकाळी 6 वाजता जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते निबंध स्पर्धा व पत्रलेखन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण व रायगड जिल्हाधिकारी कार्यालय येथील शिपाई कर्मचारी हेमंत पाटील यांच्या साहित्यातील विशेष योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

Exit mobile version