विद्यार्थी रमले मैदानात

| माथेरान | वार्ताहर |

माथेरानमध्ये इंग्रजी माध्यमाच्या सेंट झेवियर शाळेच्या परीक्षा संपल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी येथे नव्यानेच आलेल्या प्रा. सिस्टर सेसिलिया यांच्या संकल्पनेतून येथे प्रथमच समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण विकास व खेळ भावना रुजू व्हावे हा यामागचा उद्देश असल्याचे शाळेतून सांगण्यात आले.

माथेरानमध्ये असलेले इंग्रजी माध्यमाची एकमेव शाळा म्हणून लौकिक असलेले सेंट झेवियर शाळेचा परीक्षा हंगाम नुकताच संपला असून लवकरच नवीन वार्षिक वर्ष सुरू होणार आहे; परंतु या मधल्या काळामध्ये येथील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खेळ भावना रुजावी व त्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास व्हावा याकरिता शाळेकडून प्रथमच समर कॅम्पचे आयोजन केले आहे. येथील प्रसिद्ध वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडांगणामध्ये रोज शालेय विद्यार्थ्यांच्या विविध 600 खेळ व बौद्धिक चाचण्या घेतल्या जातात. खेळांमध्ये प्रामुख्याने माथेरानमध्ये प्रथमच रग्बी, ज्युडो, कराटे, योगासने व बौद्धिक प्रगती होईल, अशा कार्यशाळा घेतल्या जात आहेत. येथील विद्यार्थ्यांकडून या उपक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळत असून, पालकवर्गाकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

माथेरान हे निसर्गाच्या सानिध्यात असलेले एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. डोंगरावर असल्याकारणाने येथील विद्यार्थ्यांना मर्यादित सुविधा उपलब्ध आहेत, त्यामुळेच त्यांचा बौद्धिक व शैक्षणिक विकास व्हावा याकरिता या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रा. सिस्टर सिसिलिया


आम्हा विद्यार्थ्यांसाठी हे नवीनच होते; परंतु त्यामध्ये शिकविण्यात येणारे अनेक खेळांचे प्रकार व बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी घेण्यात येत असलेले विविध क्लासेस यामुळे आम्हा विद्यार्थ्यांना नवनवीन प्रकार शिकावयास मिळत आहेत.

मानव कदम, विद्यार्थी
Exit mobile version