| चौल | प्रतिनिधी |
चौल-भोवाळे येथील पर्वतनिवास दत्तमंदिरात रविवार, दि. 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
चौल येथील दत्तमंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेनिमित्त उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त दत्तमंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली असून, रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. गुरुपौर्णिमेच्या उत्सव सोहळ्यास पहाटे पाच वाजल्यापासून प्रारंभ होणार आहे. पहाटे दत्तमहाराजांना अभ्यंगस्नान घालण्यात येणार आहे. त्यानंतर काकडी आरती झाल्यावर मंदिर दत्तगुरुंच्या दर्शनासाठी खुले होईल. दुपारी बारा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत दर्शनासाठी येणार्या भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी साडेसहा वाजता पादुका स्नान, पूजन आणि त्यानंतर आरती होईल. या कार्यक्रमासाठी दतमंदिराचे गुरव प्रभाकर आगलावे, आरती मंडळाचे आशिष वासुदेव, सचिन राऊत, निकेश घरत यांच्यासह सर्व दत्त भक्तांचे विशेष सहकार्य लाभले आहे. दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त पहाटेपासून रात्रीपर्यंत दत्तमहाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते. दरम्यान, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरव प्रभाकर आगलावे यांच्यासह सर्व दत्तभक्त मेहनत घेत आहेत.