| अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील श्रीदत्त मंदिराची ओळख सद्गुरू श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांच्या अवधूत सांप्रदायाचे जिल्हा मुख्यालय अशी आहे. पेझारी येथील श्रीदत्त मंदिरातूनच पुढे संपूर्ण जिल्ह्यात श्रीपंत सांप्रदायाच्या शाखा विस्तारत गेल्या. हे सर्व सांप्रदाय विस्ताराचे कार्य केले ते सद्गुरू साबाजीदादा शेडगे व गुरुवर्य अण्णा राणे या गुरूशिष्य जोडीने, या गुरूप्रेमापोटी जिल्हाभरातील पंतभक्त पेझारीत एकत्र येऊन गुरुपौर्णिमा साजरी करतात. याचेच औचित्य साधत बुधवार 13 जुलैला श्रीदत्त मंदिर पेझारी येथे गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे 4.30 श्रींची पूजा व अभिषेक, श्रीपंत गुरूचरित्र पोथीच्या एकदिवसीय पारायण, सायंकाळी भक्तीचिये पोटी, बोध काकडे ज्योती या आरतीने एकदिवसीय पोथीवाचनाच्या पारायणाची सांगता होईल. तर रात्री 8 ते 10 या वेळेत श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांच्या श्रीदत्त प्रेमलहरी या भजनगाथेतील पदांवर आधारित भजनसेवा, रात्री 10 वाजता ज्योतीस्वरूप गुरू, ज्योतीस्वरूप शिष्य या आरतीने समारोप होणार आहे. सर्व पंतभक्त व गुरूबंधू भगिनींनी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित पोथीवाचन पारायणात सहभागी व्हावे असे श्रीपंत सांप्रदाय जिल्हाप्रमुख दिगंबर राणे यांनी सांगितले आहे.