पहिल्या खो-खो विश्‍वचषकाचे आयोजन

सलमान खानची ब्रँड अ‍ॅम्बेसेडरपदी नियुक्ती

। दिल्ली । क्रिडा प्रतिनिधी ।

भारतीय मातीतील खो-खो आता कात टाकून पुढे जात आहे. खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाकडून आयोजित करण्यात आलेला पहिला विश्‍वचषक 13 ते 19 जानेवारी या कालावधीत नवी दिल्ली येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय सुपरस्टार सलमान खानला खो-खो विश्‍वचषकाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केल्याची घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय खेळाडूंच्या प्रशिक्षण शिबिरात करण्यात आली.

यावेळी खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल, महासचिव एम.एस. त्यागी, तसेच भारतीय पुरुष आणि महिला संघांचे खेळाडू व प्रशिक्षक उपस्थित होते. या शिबिरात विविध देशांचे प्रतिनिधींनी सहभाग दर्शविला असून त्यांच्यासाठी प्रात्यक्षिक सामने आयोजित करण्यात आले होते. यामध्ये प्रमुख खेळाडू प्रतिक वाईकर, आदित्य गणपुले, रामजी काश्यप, दिलीप खांडवी, सुयश गरगटे, गौतम एम.के., सचिन भार्गव, विशाल, अरुण गुणकी, प्रियांका इंगळे, मुस्कान, मीनू, नसरीन, रेश्मा राठोड आणि निर्मला पांडे आदी खेळाडूंनी सहभाग घेतला होता. तसेच, या खो-खो विश्‍वचषकात 24 देशांचे संघ सहभागी होणार असून हि स्पर्धा नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय इंडोर स्टेडियमवर खेळवली जाणार आहे.

यादरम्यान, सलमान खानने आपण पहिल्या खो-खो विश्‍वचषकासाठी खूप उस्ताही असल्याचे सांगितले. तसेच, या खेळाची व आपली नाळ जुळलेली असून खो-खो सारखा भारताच्या मातीतील खेळ जगभर पसरत असल्याचे पाहून खूप आनंद झाल्याचेही त्याने सांगितले. पुढे बोलताना सलामन म्हणाला की, मी पहिल्या खो-खो विश्‍वचषकाचा भाग आहे, याचा मला अभिमान वाटतो. आपण सगळ्यांनी एकदा तरी खो-खो हा खेळ खेळलेला असेलच, त्यामुळे हि फक्त एक स्पर्धा नसून, भारताच्या मातीतील खेळाला, आत्म्याला आणि सामर्थ्याला दिलेला सन्मान आहे. तसेच, हा एक चपळ खेळ असून, तो आता जगभरात लोकप्रिय होत आहे. चला, एकत्र येऊ आणि जागतिक स्तरावर खो-खोचा उत्सव साजरा करू, असेही तो म्हणाला.

Exit mobile version