| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
मुरुड तालुका बौध्द समाज सेवा संघाच्या अधिपत्याखाली तालुक्यातील तमाम बौध्द समाजातर्फे रविवार, (दि.14) एप्रिल रोजी दरबार हॉल, मुरुड येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 133 वा तालुकास्तरीय जयंती महोत्सव सादर करण्यात येणार आहे.
यानिमित्त भव्य बाईक रॅली, महाराष्ट्रातील सुप्रसिध्द युवा वक्ता सुमेध भालेराव संगमनेरकर यांचे क्रांतिकारी व्याख्यान व प्रबोधनात्मकपर संगीत बहार या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे हे 59 वे वर्षे असून, मुरुड तालुक्यातील एकूण 22 गावांतील बौध्द बांधव व भगिनी बहुसंख्येने एकत्र येऊन दरवर्षी जयंती महोत्सव व त्यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे सातत्याने आयोजन करतात. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पद्स्पर्शाने पवित्र झालेल्या ऐतिहासिक मुरुड-जंजिरा शहरात, तालुक्यातील बौध्द समाजाच्या गेले 45 वर्षांच्या प्रलंबित मागणीनुसार, तालुक्यात उभारण्यात येणार्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारक इमारतीचे बांधकाम यावर्षी प्रगतीपथावर असल्याने तालुक्यातील तमाम बौध्द समाजात आनंदाचे वातावरण आहे, अशी माहिती संस्थचे तालुका सचिव धर्मेश मोरे यांनी दिली.