अन्यथा जमिनी परत करा

खारेपाटातील अन्यायग्रस्त शेतकर्‍यांची मागणी

। अलिबाग । प्रतिनिधी ।

प्रकल्पातून रोजगार मिळवून देण्याचे आमिष दाखवून अलिबाग तालुक्यातील शेकडो शेतकर्‍यांच्या जमिनी भांडवलदारांनी कवडीमोल भावाने विकत घेतल्या. मात्र, ती जागा आजही प्रकल्पाविना ओसाड पडून आहे. मेढेखार व काळवड खार विभागातील शेतकर्‍यांना त्याचा फटका बसू लागला आहे. उपासमारीची वेळ या शेतकर्‍यांवर आली आहे. धूर्त भांडवलदारांकडून शेतकर्‍यांची फसवणूक झाल्याचा आरोप शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाटील यांनी केला आहे. प्रकल्प उभारा, अन्यथा जमिनी परत करा, अशी मागणी होत आहे.

रायगड जिल्ह्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जात होते. विशेष म्हणजे, अलिबाग तालुक्यातील खारेपाट परिसरातील असंख्य शेतकरी भातशेतीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. मात्र, येथील शेतकर्‍यांना प्रकल्पाच्या नावाने नोकरीचे आमिष दाखवून गेल्या काही वर्षांपूर्वी दलालाच्या मदतीने भांडवलदारांनी जमिनी विकत घेतल्या. सुपिक, कसदार जमिनी भांडवलदारांना कवडीमोल भावाने विकल्या. शेतीला पूरक प्रकल्प उभारणार, शेतकर्‍यांच्या मुलांना नोकर्‍या, रोजगार देणार, आर्थिक, सामााजिक, शैक्षणिक विकास करणार असे स्वप्न त्यावेळी दाखविण्यात आले होते. शेतकर्‍यांची असहाय्यता, गरज आणि अज्ञानपणाचा फायदा घेत भांडवलदारांनी सुमारे 376 शेतकर्‍यांच्या 162 हून अधिक हेक्टर जमिनी घेतल्या. परंतु, या जागेवर अद्यापपर्यंत एकही प्रकल्प उभा राहिला नाही. जमिनी ओसाड झाल्या आहेत. त्यात समुद्राच्या उधाणामुळे जमिनी नापिक बनल्या आहेत. पिकत्या जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे लुटला गेला आहे.

अलिबाग तालुक्यातील मेढेखार व काळवड खार विभागातील मेढेखार, कळवडखार, काचळी, पिटकिरी, कातळपाडा, कुसुंबळे, खातविरा आदी गावांतील शेतकर्‍यांवर दयनीय परिस्थिती ओढावली आहे. अनेक वर्षे उलटूनही प्रकल्प उभा राहिला नसल्याने फसवणूक झाल्याचे शेतकर्‍यांच्या लक्षात आले. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे न्यायासाठी शेतकर्‍यांनी धाव घेतली. प्रकल्प उभारा, नाही तर जमिनी परत करा ही भूमिका शेतकर्‍यांनी घेतली आहे. अन्यायग्रस्त शेतकरी एकत्र येऊन मेढेखार व काळवड खार अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाटील व सर्व सदस्य सतत संघर्ष करीत आहेत. या शेतकर्‍यांनी समाजक्रांती आघाडी संघटनेच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरु ठेवला आहे. हा लढा शेवटच्या क्षणापर्यंत लढणार असून, आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार, असा इशारा पांडुरंग पाटील यांनी दिला आहे.

प्रकल्पाच्या नावाने भांडवलदारांनी जमीन विकत घेतली. मात्र, गेली अनेक वर्षे त्या जागेवर प्रकल्प उभा राहिला नाही. आज शेतकर्‍यांची अवस्था बिकट झाली आहे. शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी समाजक्रांती आघाडीच्या वतीने लढा सुरु केला आहे. मागील तीन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. परंतु, अजूनपर्यंत प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे भविष्यात हा लढा तीव्र असणार आहे. जिल्हाधिकार्‍यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.

बी.जी. पाटील, अध्यक्ष,
समाजक्रांती आघाडी महाराष्ट्र प्रदेश
Exit mobile version