| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
नवी मुंबई विमानतळ उभारण्यात आले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार आहेत. या भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्याने घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळावर शेतकरी कामगार पक्ष व इतर पक्षाच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत बैठका घेण्यात आल्या असून, आंदोलनाची दिशा लवकरच ठरविली जाणार आहे. विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव उद्घाटनाच्या दिवशीच जाहीर केल्यास समाधान राहील, अन्यथा विमान उडू देणार नाही, असा इशारा शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी दिला.
अलिबागमधील शेतकरी भवन येथे वेगवेगळ्या आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक शनिवारी (दि.4) घेण्यात आली. यावेळी जयंत पाटील बोलत होते.
यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य अनिल पाटील, शेकाप अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत, शेकाप तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, शेतकरी सभा तालुका अध्यक्ष अनिल गोमा पाटील, ॲड. विजय पेढवी, संजय पाटील आदींसह वेगवेगळ्या आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जेएनपीटी प्रकल्प उभारण्यात आला आहे. साडेबारा टक्के जमीन दिली जाणार असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे जेएनपीच्या अनुभवानुसार, पोकळ आश्वासने आम्हाला नको, असे शेकाप नेते जयंत पाटील म्हणाले. पुढे त्यांनी सांगितले, नवी मुंबई विमानतळासाठी परिसरातील 12 हून अधिक गावे उठविण्यात आली आहेत. हजारो एकर जमीनी घेण्यात आल्या आहेत. प्रकल्पग्रस्तांसह स्थानिक भूमीपुत्रांना रोजगार देणार या आश्वासनावर जमीनी देण्यात आल्या आहेत.
विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी येणार आहेत. या विमानतळावर हजारोंची भरती केली जाणार आहे. 80 टक्केहून अधिक भरती ही स्थानिकांची होणे गरजेचे आहे. नवी मुंबईसह पनवेल व जिल्हयामध्ये अनेक तरुण तरुणी उच्च शिक्षित आहेत. त्यांना विमानतळामध्ये नोकरी मिळावी पाहिजे ही शेकापची भूमिका आहे. याबाबत मनसे नेते राज ठाकरे यांच्या सोबत बैठक झाली. शिवसेना (उबाठा) राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेस आदी पक्षातील नेते मंडळींसोबत बैठक घेऊन आंदोलनाची भुमिका आणि दिशा ठरविली जाणार आहे. अलिबागमध्ये शेकाप भवनमध्ये शनिवारी बैठक घेण्यात आली आहे. पनवेल येथे होणाऱ्या बैठकीनंतर आंदोलन कशा पध्दतीने असणार आहे, हे ठरविले जाणार आहे.
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत अनेक वेळा घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. बुधवारी विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. त्याच दिवशी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचे विमानतळ असल्याचे जाहिर करावे. तर तमाम जनतेला समाधान वाटेल. शेकाप इतर पक्षाच्या वतीने होणारे आंदोलन प्रखर असणार आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
पंचनामे तात्काळ करा
अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यासह अलिबाग तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेला घास गेल्याची चिंता निर्माण झाली आहे. मात्र, अजूनपर्यंत नुकसानीचे पंचनामे केले जात नाहीत, अशी तक्रार शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्याकडे ग्रामस्थांनी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून जयंत पाटील यांनी तहसीलदार विक्रम पाटील यांच्याशी संपर्क साधला. नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा, अशी सुचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
खड्डेमय रस्त्याविरोधात रस्ता रोको करणार
अलिबाग-पेण, अलिबाग रोहा, अलिबाग मुरूड मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्डे बूजविण्यासाठी 22 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. काही दलाल टक्केवारी घेत आहेत. रस्त्यांच्या कामाबाबत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे चित्र समोर आले आहे. सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहे. खड्डयांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासन शासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. लवकरच पक्षाच्या वतीने रास्ता रोको करण्यात येणार असून, त्याची तयारी करा. कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा, असे आवाहन शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले.
