अन्यथा अनधिकृत नळजोडण्या उखडून काढू

रेवस परिसरातील महिला आक्रमक

| रायगड | प्रतिनिधी |

रेवस पाणीपुरवठा योजनेला सोगाव ते कोप्रोली या परिसरात असंख्य अनधिकृत नळजोडण्या आहेत. त्यावर कारवाईची प्रशासनाकडे अनेकदा मागणी करुनही दुर्लक्ष केले जात आहे. पाण्याच्या मागणीसाठी आमची सहनशीलता संपली आहे. येत्या दोन दिवसांत कारवाई करावी, अन्यथा आम्ही या अनधिकृत जोडण्या उखडून काढू, असा इशारा महिलांनी दिला.


सारळपूल येथील मंगल कार्यालयात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक पार पडली. या बैठकीत महिला आक्रमक झाल्या होत्या. पाणीसमस्येचा पाढा वाचून महिलांनी पाणीपुरवठा उपअभियंता निहाल चवरकर यांना धारेवर धरले. पाच ग्रामपंचायतींनी अनधिकृत नळजोडणी काढण्यासाठी प्रशासनाला लेखी मागणी केली आहे. यामुळे येत्या दोन दिवसांत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पोलीस बंदोबस्तात अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करावी. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत पाणीपुरवठा बंद करून रेवस परिसरातील ग्रामपंचायतींना टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी कासावीस ग्रामस्थांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडे केली. या बैठकीला अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश पाटील, रांजणखार डावली ग्रामपंचायतीचे सरपंच हेमंत पाटील, मिळकतखार उपसरपंच अभिषेक कडवे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता निहाल चवरकर, ग्रामसेविका निशा चंदनकर, रेवस परिसरातील ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.


गेले 32 वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी रेवस परिसरातील गावांचा संघर्ष सुरु आहे. केलेली उपोषणे, मोर्चे आणि आंदोलनांचे फलित केवळ आश्वासनांचे गाजर ग्रामस्थांच्या पदरात पडले आहे. रेवस नळपाणीपुरवठा योजना राबवूनही ग्रामस्थांचा घसा कोरडाच राहिला आहे. या योजनेच्या पाईपलाईनवर राजकीय दबाव टाकून अनधिकृत नळजोडण्या केल्या आहेत. याकडे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी रेवस, सारळ, मिळकतखार, कोप्रोली आणि रांजणखार डावली या ग्रामपंचायतींनी एकजुटीने संघर्ष सुरु ठेवला आहे. पाण्यासाठी सुरु असलेला संघर्ष पोलीसबळाचा वापर करून दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाणी नसणे ही महिलांची समस्या आहे. दररोज 200 रुपये कमवायचे आणि 150 रुपये पिण्याच्या पाण्यासाठी खर्च करायचे, मग खायचे काय, असा संतप्त सवाल महिलांनी बैठकीत विचारला.

रेवस पाणीपुरवठा योजनेवर सोगाव ते कोप्रोलीमध्ये असंख्य अनधिकृत नळजोडण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक जोडण्या झिराड परिसरात आहेत. येथे राजकीय दबावतंत्र वापरून अनधिकृतपणे पाणी चोरले जात आहे. या अनधिकृत जोडण्या करणाऱ्यांवर आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांवर राजकीय दबावतंत्र वापरणाऱ्यांवर तातडीने कारवाई करायला हवी. असे झाले तरच रेवस परिसरातील ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा सुरळीत होईल. प्रशासनाने कारवाई केली नाहीतर आम्ही या जोडण्या उखडून काढणार आहोत.

हेमंत पाटील, सरपंच, रांजणखार डावली

रेवस परिसरातील गावांना सुरळीत पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या पाईपलाईनवरून खुलेआम पाणी चोरले जात आहे. यासाठी अनधिकृत पाणी जोडण्या करण्यात आल्या आहेत. या जोडण्या दोन दिवसांत तोडून काढाव्यात. या सर्व जोडण्यांचा लेखाजोखा संबंधित ग्रामसेवकांकडे आहे. यामुळे पाणीचोरांवर कारवाई करणे प्रशासनाला सोपे जाईल. जोपर्यंत पाणीचोरांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत पाणीपुरवठा बंद करुन टँकरने पाणीपुरवठा करावा. आजची बैठक तहकूब करण्यात यावी.

प्रकाश पाटील, माजी सभापती,
अलिबाग पंचायत समिती

रेवस पाणीपुरवठा योजनेतून दररोज पाणी सोडण्यात येते. मात्र, टाक्यांमध्ये पाणी पडत नाही. योजनेवर पाणी सोडण्याची कळ बंद करायला गेल्यावर कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली जाते. यामुळे रेवस परिसरातील रेवस, मिळकतखार, रांजणखार डावली, कोप्रोली आणि सारळ या ग्रामपंचायतींनी लेखी स्वरूपात ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी यांच्याकडे अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्याची मागणी करावी. ही मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळविण्यात येईल. त्यांच्या मार्गदर्शनानुसार कारवाई करण्यात येईल.

निहाल चवरकर, उपअभियंता,
पाणीपुरवठा विभाग, अलिबाग
Exit mobile version