अन्यथा फडणवीसांंच्या घरासमोरच आंदोलन करू

जरांगेंचा इशारा


| मुंबई | वृत्तसंस्था |

20 जानेवारीपासून मुंबईत आंदोलनासाठी येणारे ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न केल्यास देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोरच आम्ही आंदोलन करू असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे.
गृहमंत्री वाहने अडवणार नाहीत. वाहने अडवली, तर आम्ही खाण्यापिण्याचे सामान, कपडे, इतर वस्तू कशा न्यायच्या, असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला. सगळ्या मराठा बांधवांना विनंती आहे की कुणीही घाबरण्याचं कारण नाही. कसे गुन्हे दाखल करता, तेच बघूया, असा इशारा त्यांनी दिला.

मराठा आरक्षणासाठी मुंबईत बेमुदत उपोषण होण्यावर आम्ही ठाम आहोत. त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळतील. हे आंदोलन शांततामय आणि लोकशाही मार्गाने होणार आहे. त्यामुळे आम्हाला परवानगी द्यावीच लागेल. परवानगी न मिळाल्यास या देशात कायदा, नियम आणि लोकशाहीच राहिली नाही, असा त्याचा अर्थ होईल, असेही जरांगे म्हणाले.

मुंबईत होणाऱ्या आंदोलनासाठीची व्यवस्था पाहण्यासाठी आमचं शिष्टमंडळ गेले आहे. आंदोलकांची संख्या पाहता आम्हाला अनेक मैदानं लागणार आहेत. तसेच सर्व मराठ्यांनी मतभेद सोडून गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण व्हावं म्हणून एकत्र येऊन साथ द्यावी, सोबत यावं, अशी विनंती आम्ही मुंबईतील मराठा बांधवाना केली आहे, असेही जरांगे पाटील यांनी सांगितलं.

Exit mobile version