| पनवेल | वार्ताहर |
आदर्श शैक्षणिक समूह संचलित श्री.बापूसाहेब डी. डी.विसपुते बी.एड, एम. एड, डी.एस.एम, बी.लिब आणि डी.एड महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “आमची माती आमची माणसं “कला महोत्सव 2024 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी आणि आपल्या मायबाप शेतकऱ्यांना मानाचा मुजरा म्हणून शेतकऱ्यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक गीतांचा व नृत्याचा अविष्कार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करण्यात आला.
आपल्या शेतकरी राजाला समर्पित करण्यात आलेल्या या अस्सल मराठमोळ्या कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकचे कुलगुरू प्रा.संजीव सोनवणे, सहसंचालक, उच्चशिक्षण विभाग संजय जगताप, मुंबई विद्यापीठ शिक्षण शास्त्र विद्यापीठाच्या विभाग प्रमुख डॉ.सुनीता मगरे, भाजपा शिक्षक आघाडीचे, प्रदेश संयोजक प्रशाम कोल्हे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख, विद्यार्थी कल्याण आणि बहिःशाल केंद्राचे संचालक डॉ. दयाराम पवार, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मुंबई विभागाचे विभागीय संचालक डॉ.वामन नाखले, आदर्श समूहाचे चेअरमन धनराज विसपुते, संचालिका संगीता विसपुते, प्राचार्या डॉ.सीमा कांबळे, श्रीम.कुसुम मधाळे अशा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे आणि महाविद्यालयाचे कौतुक करून पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.संजीव सोनवणे यांनी विसपुते महाविद्यालयाचे अभ्यास केंद्र हे एक आदर्श अभ्यास केंद्र असून हा सर्वांसाठी एक आदर्श आहे आणि मी जर या कार्यक्रमाला आलो नसतो तर खूप काही गमावलं असतं हे विधान करत महाविद्यालयाच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली तर विभागीय संचालक संजय जगताप यांनी देखील मी पाहिलेल्या विविध कार्यक्रमांपैकी सर्वोत्कृष्ट कार्यक्रम आहे असे म्हणत सर्वांनाच प्रेरित केले तर प्रशाम कोल्हे यांनी विसपुते महाविद्यालय आणि विसपुते दाम्पत्य यांचे कौतुक केले. संस्थेचे चेअरमन धनराज विसपुते यांनी संस्थेची भूमिका स्पष्ट करत विद्यार्थी विकासासाठी मी सतत बांधील असेन असे म्हणत सर्वांना शुभेच्छा दिला. विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्साह, अस्सल गावरान बाज आणि सारं काही शेतकऱ्यांसाठी या साऱ्यामुळे वातावरण हर्ष उल्हासाने भरून गेले होते. मान्यवरांच्या डोक्यावरील गांधी टोपी, सर्जा राजाचे पूजन, शेतकरी राजाची झोपडी, तहान भागवणारी विहीर, सारी अवजार आणि अस्सल शेतकरी बाजाची गाणी त्यातही खायला गोड गुळ आणि प्यायला पाणी या साऱ्यामूळ वातावरण शेतकरीमय झालं होतं.







