शाळाबाह्य मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात

भटकंती करणाऱ्या कुटुंबातील 57 मुलांना प्रवेश

| पनवेल | वार्ताहर |

अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांकरिता भटकंती करणाऱ्या कुटुंबातील 57 मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश मिळवून देण्याचे मोठे काम कोलते दांपत्याने केले आहे. अर्थात, रायगड जिल्हा व पनवेल तालुका शिक्षण विभागाकडून यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यानुसार अंगणवाडी आणि रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हे मुलं-मुली ज्ञानाचे धडे गिरवत आहेत. अज्ञानाच्या अंधारात ज्ञानाचा उजेड पडल्याचा प्रत्यय या निमित्ताने सर्वांनाच आला.

जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालेच पाहिजे. तो त्यांचा मूलभूत हक्क आणि अधिकार आहे. मात्र, गरिबी ही पाटी-पेन्सिलच्या आड येते. दोन वेळच्या अन्नासाठी भटकंती करणाऱ्या कुटुंबाच्या आरोग्य आणि शिक्षण कोसो मैल दूर राहते. वास्तविक पाहता, आरटीई आणि सर्व शिक्षा अभियानांतर्गत सर्वांना शिक्षण देण्याच्या अनुषंगाने केंद्र व राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. त्यानुसार शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रवेश सुद्धा दिला जात आहे. मात्र, कागदी घोडे नाचवणारी यंत्रणा, अनास्था दाखवणारी शासकीय व्यवस्था आणि शिक्षणाचे महत्त्व न समजणारे आई-वडील या अनेक कारणांमुळे कित्येक लहान मुलं-मुली शिक्षणापासून वंचित आहेत. ते सिग्नलवर एक तर भीक मागतात किंवा वेगवेगळ्या वस्तू विक्री करताना दिसतात.

कळंबोली उड्डाणपुलाखाली या स्थितीतील अनेक कुटुंबं भाकरीत चंद्र शोधतात. देशाचे हे भवितव्य आणि उद्याचे नागरिक निरक्षर राहू नये या उद्देशाने अनिता कोलते आणि त्यांचे पती डॉ. योगेंद्र कोलते यांनी स्वामी विवेकानंद मानवसेवा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून कळंबोली उड्डाणपुलाखाली बिनभिंतीची शाळा सुरू केली. या ठिकाणी या मुलांना लिहिण्या वाचण्यास शिकवले जाते. त्याचबरोबर त्यांचे भविष्य उज्वल करण्याच्या अनुषंगाने ही कोलते दांपत्य प्रयत्नाची पराकाष्ठा करीत आहेत. शेकडो शाळाबाह्य विद्यार्थ्यांना त्यांनी साक्षर केले आहे.

या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गटशिक्षणाधिकारी सिताराम मोहिते यांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये यापैकी काही मुलांना या शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. आसूड गाव जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 27 मुलं दाखल करण्यात आली आहेत. तर, अंगणवाडीतही कळंबोली उड्डाणपुलाखालील 30 मुलं-मुली जाऊ लागल्या आहेत. इतर विद्यार्थ्यांमध्ये आता ते मिसळू लागले आहेत. त्याचबरोबर चांगला अभ्यासही करीत आहेत. त्यांचे शैक्षणिक भवितव्य यामुळे उज्वल होणार आहे.

Exit mobile version