। कोल्हापूर । वृत्तसंस्था ।
शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील महावितरण कार्यालय पेटवले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचे गेल्या सात दिवसांपासून कोल्हापुरातील महावितरणाच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहेत. सरकार दरबारी या आंदोलनाची दखल अद्याप घेतली नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला असून, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकरी आक्रमक होत आहेत. रविवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या घटनेत महावितरणाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. महावितरणाच्या कार्यालयाला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आले, मात्र महावितरणाच्या कार्यालयाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या मागण्यांवर महाविकास आघाडी सरकारने तातडीने तोडगा न काढल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आंदोलन भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.