अत्याचाराविरोधात आक्रोश आंदोलन

आझाद समाज पार्टीच्या महिला आक्रमक
पनवेल | वार्ताहर |
महिलांवरील अत्याचार्‍याच्या विरोधात पनवेल येथे आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून आक्रोश आंदोलन करण्यात आले. शहरांमध्ये महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना महिला कुठेही सुरक्षित राहिली नाही. गाव आणि जिल्हा पातळीवर महिलांच्या सक्षमीकरणासाठी मेळावे आणि शिबीर आयोजित करून जनजागृती केली जात असली तरी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर होत आहे. महिलांवरील अत्याचार, शाळा, महाविद्यालयात शिकणार्‍या मुलींची छेडछाड करून विनयभंग करणे, लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे, पुरुषांकडून महिलेस मारहाण अशा घटनांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ होताना दिसत आहे.
महिला, मुली, तरुणींवर अन्याय अत्याचार करणार्‍या अशा नराधमांवर वचक बसण्याकरिता आझाद समाज पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा नेहा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुका अध्यक्षा रुपाली शिंदे यांच्या वतीने पनवेल तहसील कार्यालय येथे जोरदार आक्रोश आंदोलन करण्यात आले. मुसळधार पाऊस असतानादेखील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. जोरदार निदर्शनांनंतर तहसीलदार आणि डीसीपी यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनासाठी आजाद समाज पार्टी महाराष्ट्र अध्यक्षा नेहा शिंदे, कोषाध्यक्षा राजश्री अहिरे, रायगड जिल्हा संघटक जयश्री पाटील, पनवेल तालुका अध्यक्षा रुपाली शिंदे, साईनगर विभाग अध्यक्षा विद्या जाधव आदींसह अनेक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Exit mobile version