| भंडारा | प्रतिनिधी |
लाखनी पोलीस ठाण्यांतर्गत पिंपळगाव सडक येथील शेतजमिनीला लागून एका बॅगमध्ये नवजात शिशू आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी (दि.13) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. मानेगाव सडक येथील शेतजमिनीला लागून असलेल्या झाडाजवळ एका काळ्या रंगाच्या बॅगमध्ये 8 ते 10 दिवसांचे नवजात बाळ आढळले. या माहितीवरून लाखनीचे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे घटनास्थळी पोहोचले. बॅगची पाहणी केली असता त्यामध्ये एक स्त्री जातीचे नवजात बाळ मिळून आले. त्या बाळाला तत्काळ ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे नेण्यात आले. तेथे उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा येथे हलवण्यात आले. या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत. मानेगाव शिवारात नवजात बाळ मिळाल्यामुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे.







